तोट्या बसविल्यास ३ दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत

By Admin | Updated: October 30, 2014 00:27 IST2014-10-30T00:25:29+5:302014-10-30T00:27:59+5:30

लातूर : कमी पर्जन्यमानामुळे लातूर शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट आले आहे. आज जागतिक काटकसर दिन आहे. कुटुंब कबिला चालविण्यासाठी जशी काटकसर केली जाते,

Saving losses to 3 million liters of water | तोट्या बसविल्यास ३ दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत

तोट्या बसविल्यास ३ दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत


लातूर : कमी पर्जन्यमानामुळे लातूर शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट आले आहे. आज जागतिक काटकसर दिन आहे. कुटुंब कबिला चालविण्यासाठी जशी काटकसर केली जाते, तशी काटकसर पाण्याचा वापर करताना केल्यास लातूरला शहरात दररोज ५ दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय, लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरण यंत्रणेनेही याला दुजोरा दिला आहे. नळाला तोट्या बसविल्यास ३ दशलक्ष लिटर्स आणि लिकेजवर नियंत्रण ठेवल्यास २ दशलक्ष लिटर्स असे एकूण ५ दशलक्ष लिटर्स दररोज पाण्याची बचत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लातूर शहराला दररोज ३० ते ३२ दशलक्ष लिटर्स पिण्याचे पाणी लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठ्याची योजना सुरू असून, सध्या शहराला आठ दिवसांआड पाणी सोडण्यात येत असले, तरी ३० ते ३२ दशलक्ष लिटर्स या दैनंदिन गरजेनुसार पाणी देण्यात येते. शहरात ४२ हजार ५०० अधिकृत नळधारक आहेत. तर दोन ते तीन हजार अनाधिकृत नळधारकांची संख्या आहे. त्यांचे एक कनेक्शन अधिकृत तर दुसरे अनधिकृत आहे. ज्या नळधारकांचे मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन आहे, त्यांच्या नळाला तोट्या असणे आवश्यकच आहे. तोट्या नसल्यामुळे बेसुमार पाण्याचा वापर होतो. शिवाय, रस्त्यावर आणि प्रांगणात सडा टाकून पाणी वाया घालविले जाते. यात किमान हजारो लिटर्स पाण्याची नासाडी होते. हा अनुभव प्राधिकरणाचा आहे. आवश्यक पाणी घेऊन नळाच्या तोट्या बंद कराव्यात. त्यामुळे मोठ्या दाबाने खालच्या ग्राहकांनाही नियमानुसार पाणी मिळेल. परंतु, असे होत नाही. पिण्याचे पाणी भरल्यानंतरही ग्राहकांकडून नासाडी होते. यात दिवसाचा विचार केला तर तीन दशलक्ष लिटर्स पाण्याची नासाडी होते. त्यामुळे दैनंदिन गरजेनुसार ३० ते ३२ दशलक्ष लिटर्स पाणी आठ दिवसांआड सोडत असलो तरी यात वाया जाण्याचे प्रमाण ३ दशलक्ष लिटर्स आहे, असे जीवन प्राधिकरणाचे अभियंता रमेश सोनकांबळे यांनी सांगितले. दरम्यान, ३ दशलक्ष लिटर्स पाणी आपण बचत करू शकतो. तसे नागरिकांनी ठरविण्याची गरज आहे.
जलवाहिन्यांच्या लिकेजमुळे २ दशलक्ष लिटर्स पाणी वाया जाते, असे काही नागरिकांचे म्हणणे असले, तरी पाणीपुरवठ्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाकडे आल्यापासून आम्ही जलवाहिन्यांच्या लिकेजवर नियंत्रण ठेवले आहे. लिकेज दिसताच ते दुरुस्त करून पाणी वाया जाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण आणले असल्याची कार्यकारी अभियंता सोनकांबळे यांनी सांगितले.

Web Title: Saving losses to 3 million liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.