‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान राहिले कागदावरच
By Admin | Updated: August 22, 2014 00:58 IST2014-08-22T00:51:03+5:302014-08-22T00:58:14+5:30
परंडा : भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ हे अभियान सुरू केले असून, यात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील

‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान राहिले कागदावरच
परंडा : भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ हे अभियान सुरू केले असून, यात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील पाच ग्रामपांयतींची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेला आता तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असला तरी लघु पाटबंधारे विभागाने मात्र निवड झालेल्या ग्रामपंचायतींना अद्याप साधी कल्पनाही दिलेली नाही. त्यामुळे हे अभियान केवळ कागदावरच राहिल्याचे दिसत आहे.
जून महिन्यात सुरू झालेले हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या अभियानातंर्गत भूजल पातळी सर्वेक्षण व परिक्षण करणे, परिसरात पर्जन्यमापक यंत्र बसवून पावसाची नोंद करणे, तंत्रशुद्ध पद्धत्तीने वॉटर अकाऊंट करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे, शासकीय-निमशासकीय, खाजगी, इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टींग उभारण्यासाठी प्रत्येक कुटूंबप्रमूख, बचतगटातील महिलांना प्रवृत्त करणे, पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जागोजागी उतारात चर खोदणे, नादुरुस्त तलाव, विहिरी शेततळयांमधील गाळ काढून जलसंचय करणे, भूगर्भस्तर आणि भूजल पातळीच्या क्षमतेनुसार ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे मुल्यमापन करुन या स्पर्धेत सहभागी व्हावयाचे आहे.
या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या योजनेत लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने निवड झालेल्या ग्रामपंचयातीमध्ये स्पर्धा लावण्यात आल्या असून, पात्र ग्रामपंचायतींचा शासनाकडून गौरवही होणार आहे.
या अभियानासाठी तालुक्यातील जवळा (नि), भांडगाव, पांढरेवाडी, साकत (बु) आणि मुगाव पाच पाच ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. मात्र, अभियानाचा कालावधी सुरू होऊन अडीच महिने झाले तरी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने अद्याप या ग्रामपंचायतींशी साधा संपर्कही साधला नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या पाचही गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे हे अभियान योग्य वेळेत सुरू झाले असते तर टंचाई काळात ग्रामस्थांना याचा फायदा झाला असता. (वार्ताहर)