७०४ ग्रा़पं़मध्ये पाणी साठवा गाव वाचवा अभियान

By Admin | Updated: July 4, 2014 00:10 IST2014-07-04T00:03:05+5:302014-07-04T00:10:46+5:30

परभणी : जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास व संबंधित विभागाच्या वतीने पाणी साठवा गाव वाचवा हे अभियान ७०४ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.

Save water in 704 villages | ७०४ ग्रा़पं़मध्ये पाणी साठवा गाव वाचवा अभियान

७०४ ग्रा़पं़मध्ये पाणी साठवा गाव वाचवा अभियान

परभणी : ग्रामीण भागात पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी व गावात पडलेला पाऊस साठवून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास व संबंधित विभागाच्या वतीने पाणी साठवा गाव वाचवा हे अभियान ७०४ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या अभियानात सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी पाणी साठवा गाव वाचवा हे अभियान १५ जून ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी भौगोलिक रचना, भूगर्भस्तर आणि भूजल पातळीच्या क्षमतेनुसार केलेल्या कामाचा तपशिलासह आपले अर्ज ३१ डिसेंबरपर्यंत पंचायत समितीकडे सादर करावयाचे आहेत. पंचायत समितीने निवड समितीद्वारे अर्जाची छानणी करून प्रत्यक्षात झालेल्या कामाची पाहणी करून उत्कृष्ट व पात्र ग्रामपंचायतीचे अर्ज जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ३१ जानेवारीपर्यंत पाठवावेत. जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या अर्जाची छानणी करून जिल्हास्तरीय सहनियंत्रण समितीच्या मान्यतेने १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत तालुका व जिल्हास्तरीय विजयी ग्रा.पं.ला प्रथम, द्वितीय, तृतीय प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पाणी साठवा गाव वाचवा या अभिनव स्पर्धात्मक योजनेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे, पंचायत विभागाचे उपविभागीय अधिकारी एम.व्ही. करडखेडकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
सहनियंत्रण समिती गठीत
निसर्गाचा असमतोल आणि पाणी व्यवस्थापनाच्या अभावामुळे ग्रामीण जनतेत नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने ग्रामीण भागामध्ये जलसंधारण व पाणीपुरवठ्यासंबंधी विविध विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या योजनेच्या अंमलबजावणसाठी ‘पाणी साठवा गाव वाचवा’ या कार्यक्रामाच्या माध्यमातून योग्य समन्वय साधून पाऊस पाणी संकलन, भूजल पातळीची वाढ, पाणी व्यवस्थापन या प्रमुख बाबीवर ग्रामपंचायतींना सहभागी करून घेऊन काम करून घेण्यात येणार आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर ग्रामविकास मंत्री, जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहनियंत्रण समिती गठीत करण्यात येणार आहेत

Web Title: Save water in 704 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.