महसूलच्या जुन्या कागदपत्रांचे जतन !

By Admin | Updated: May 22, 2015 00:34 IST2015-05-22T00:22:36+5:302015-05-22T00:34:12+5:30

लातूर : भूमीअभिलेख व महसूलच्या जुन्या तसेच दुर्मिळ कागदपत्रांचे जतन करण्यासाठी स्कॅनिंगचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे

Save Old Revenue Reports! | महसूलच्या जुन्या कागदपत्रांचे जतन !

महसूलच्या जुन्या कागदपत्रांचे जतन !


लातूर : भूमीअभिलेख व महसूलच्या जुन्या तसेच दुर्मिळ कागदपत्रांचे जतन करण्यासाठी स्कॅनिंगचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील चार केंद्रांवर दर दिवसाला ४ हजार पानांचे स्कॅनिंग केले जात आहे. या सर्व कागदपत्रांचे संकलन जिल्हाधिकारी कार्यालयातील मेटा डाटावर केले जाणार आहे. आतापर्यंत १ लाख ५५ हजार ८०० दस्ताऐवज स्कॅनिंग झाले आहेत.
महसूल विभागातील जुने खासरा पाहणी, कुळ रजिस्टर, पाहणी पत्र, सातबारा, फेरफार आदी दस्ताऐवज खराब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व कागदपत्रांचे संकलन करून स्कॅनिंग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर, अहमदपूर, लातूर या चार केंद्रांवर या कागदपत्रांचे स्कॅनिंगचे काम सुरू आहे. तहसील कार्यालयाअंतर्गत १ लाख ५५ हजार ८०० या जुन्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. भूमीअभिलेखाअंतर्गत असलेल्या कब्जा पावती, आकारबंद, जबाब फाईल, पक्का बुक, शेत पुस्तक, गटांचे नकाशे, एकाधिकार योजना, प्रती बुक, आकार फोड आदी जुन्या कागदपत्रांचे जतन करण्यात येत आहेत. या कागदपत्रांचे स्कॅनिंगही सुरू करण्यात आले आहे. ५१ गावांतील रेकॉर्डचे स्कॅनिंग झाले असून, भूमीअभिलेख अंतर्गत ५७ हजार ८६२ दस्ताऐवज स्कॅनिंग झाले आहेत.
महसूलच्या १४ तलाठ्यांची टीम या कामी गुंतलेली आहे. चार केंद्रांवर ते काम सुरू आहे. त्यांच्या सोबतीला संगणकावर काम करणारे तज्ज्ञ कर्मचारी नियुक्त केले आहेत. दिवसाला ४ हजार महत्वाची कागदपत्रे स्कॅन केली जात आहेत. महसूलसाठी लातूर तालुक्यातील ५७ गावांची महत्त्वाची कागदपत्रे या मोहिमेत जतन केली जात आहेत.
प्रशासकीय कामकाजासाठी जुन्या कागदपत्रांची गरज लागते. त्यामुळे ही महत्वाची कागदपत्रे संगणकात जतन केली जात आहेत. मागचे संदर्भ पाहण्यासाठी या कागदपत्रांची गरज लागते. त्यामुळे जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात येत आहे. महिनाभरात सर्व जुने अभिलेखे स्कॅन होतील, अशी माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
स्कॅनिंग झालेली सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील मेटा डाटा या संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहेत. स्कॅनिंग केलेल्या कागदपत्रांचे व्यवस्थित प्रिंटिंग येते का, त्याची दुसरी चांगली प्रत संगणकाच्या प्रिंटरमधून बाहेर पडते का, याबाबतची तपासणी करून मेटाडाटा या प्रणालीवर ते लोड करण्यात आले आहेत. दुर्मिळ आणि जीर्ण झालेली कागदपत्रे संगणकीय प्रणालीमुळे जतन करता येत आहेत, असे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
महसूलची १ लाख ५५ हजार ८०० आणि भूमीअभिलेख विभागाची ५७ हजार ८६२ महत्वाची कागदपत्रे स्कॅनिंग झाली आहेत. सध्या चाकूर, लातूर, औसा, रेणापूर आणि अहमदपूर येथील केंद्रांवर स्कॅनिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दिवसाला ४ हजार कागदपत्रे स्कॅनिंग केले जात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले.

Web Title: Save Old Revenue Reports!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.