राज्यघटना वाचवणे हेच खरे देशप्रेम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:51 IST2017-08-08T00:51:20+5:302017-08-08T00:51:20+5:30
संविधान वाचविणे हेच देशप्रेम आहे, असे मत जेएनयूचा विद्यार्थी संसदेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने व्यक्त केले.

राज्यघटना वाचवणे हेच खरे देशप्रेम...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशाचा आत्मा असलेल्या संविधानावर हल्ला होत आहे. ते संविधान वाचविण्याची जबाबदारी देशातील युवकांची असून, फेसबुक, टिष्ट्वटरवर पोस्ट टाकून लढा देणे शक्य होणार नाही. त्यासाठी ग्राऊंडवर जावे लागेल. संविधान वाचविणे हेच देशप्रेम आहे, असे मत जेएनयूचा विद्यार्थी संसदेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने व्यक्त केले.
‘सेव्ह इंडिया, चेंज इंडिया’ अभियान राबविण्यासाठी कन्हैया देशभर जाणार असून, त्याने सोमवारी औरंगाबादेत संविधान बचाव युवा परिषदेत देशातील राज्यकर्ते, भाजप, रा.स्व. संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला टीकेचे लक्ष्य करीत सर्वधर्मसमभावाची हाक दिली. त्याला ऐकण्यासाठी सिडको संत तुकाराम नाट्यगृहाच्या आत व बाहेर गर्दी होती. त्याने तासभर केलेल्या भाषणात युवकांना विचार संजीवनी मिळाली.
तो म्हणाला, गोरक्षकांना सीमेवर टांगले पाहिजे. त्यांची नजर अतिशय एक्स-रे सारखी आहे. त्यांना गोरक्षक आणि भक्षक दिसतात. सकाळी उठून रात्री शिळ्या भाकरी गायीला खाऊ घातल्याने गायींची सेवा होत नाही. मोदींनी हेलिक ॉप्टरमधून उतरून खाली चालावे. सिम्बॉलिझम करून राजकारण्याचा प्रघात यांनी पाडला आहे. दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्यापेक्षा त्यांना तुमच्या घरी जेवायला बोलवा. मग परिवर्तन झाले असे समजेल, असे कन्हैया म्हणाला. व्यासपीठावर २६ विद्यार्थी संघटनांचे नेते होते. प्रास्ताविक अॅड. अभय टाकसाळ यांनी केले. अॅड. बी. एस. गायकवाड, प्रा. भारत शिरसाट, प्रा. राजाराम राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती.