वाचवा.... वाचवा....

By Admin | Updated: June 12, 2017 00:20 IST2017-06-12T00:20:14+5:302017-06-12T00:20:42+5:30

कडा : पहाटेची वेळ.. मी चहा बनवत होतो.. एवढ्यात बाजूच्या वळणाकडून धाडधाड वाजल्याच्या आवाज आला... तिकडे वळून पाहिले तर बस पलटल्याचे दिसले...

Save .... | वाचवा.... वाचवा....

वाचवा.... वाचवा....

नितीन कांबळे / गणेश दळवी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : पहाटेची वेळ.. मी चहा बनवत होतो.. एवढ्यात बाजूच्या वळणाकडून धाडधाड वाजल्याच्या आवाज आला... तिकडे वळून पाहिले तर बस पलटल्याचे दिसले... आम्ही घटनास्थळी धाव घेतली.. जवळ जाताच बसमध्ये अडकलेल्या प्रत्येकांच्या तोंडून एकच शब्द निघत होता, वाचवा.. वाचवा! संकटात सापडलेल्या प्रवाशांच्या तोंडून आलेली ही आर्त हाक काळजाला चर्रर्र करून गेली. पण भावनिक होऊन चालणार नव्हते. माझ्यासह सर्वांनीच जखमींना बाहेर काढत मिळेल त्या वाहनांतून रुग्णालयाच्या दिशेने मार्गस्थ केले. हा अनुभव सांगताना घटनास्थळापासून जवळच असलेल्या हॉटेलचे चालक शौकत सय्यद यांना अश्रू अनावर झाले.
शौकत सय्यद यांचे रात्रभर हॉटेल चालते. अहमदनगर-बीड मार्गावरून ये-जा करणारी वाहने येथे थोडासा आराम मिळावा व पहाटेच्यावेळी गरम गरम चहा पिण्यासाठी या हॉटेलवर थांबतात. रविवारी पहाटेही असेच काही लोक येथे चहा पीत होते. शौकत सय्यद त्यांना चहा बनवत होते. एवढ्यात धानोरा घाटाकडच्या वळणावरून या सर्वांना धाडधाड वाजल्याचा आवाज आला. कानठळ्या बसतील अशा या आवाजाने सर्वच भयभीत झाले. सर्वांनीच आवाजाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांना बस घाटाच्या खाली उलटल्याचे दिसले. हॉटेलचालक शौकत यांच्यासह चहा पिण्यासाठी बसलेले इतर लोक हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांनी बसकडे धाव घेतली. कोणी दरवाजा तोडत होते, तर कोणी काचा फोडत होते. अंधार असल्याने दिसण्यासही अडचणी येत होत्या. शांत वातावरणात फक्त आवाज होता तो रडण्याचा.
या गंभीर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. परिसरातील नागरिकांनाही फोनवरून ही माहिती देण्यात आली. तत्पूर्वीच हॉटेलच्या वेटरने आणि इतर लोकांनी सर्व जखमींना बसमधून बाहेर काढले. त्यांना उचलून रस्त्यावर आणले. राज्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना ते हात करून थांबवू लागले. विनंती करून जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती करीत होते. याचवेळी काही जखमींना तर टेम्पोतून नगरला पाठविण्यात आले.
एवढ्यात पोलिसही आले. तत्पूर्वी पोलिसांनी अपघाताची माहिती समजताच १०८ या रुग्णवाहिकेला फोन करून घटनास्थळी बोलविले.
पोलीस, आरोग्य सेवाही तेथे दाखल झाली. परिसरात केवळ आक्रोश होता. परिसरात रक्ताचा सडा पडला होता. प्रवाशांनी सोबत आणलेल्या पिशव्या फाटल्याने त्यातील साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते.

Web Title: Save ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.