शहरातील बेशिस्त वाहतूक सावरता सावरेना !
By Admin | Updated: January 23, 2017 23:32 IST2017-01-23T23:31:07+5:302017-01-23T23:32:21+5:30
लातूर : लातूर शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगामच नाही़

शहरातील बेशिस्त वाहतूक सावरता सावरेना !
लातूर : लातूर शहरातील शिवाजी चौकात बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात होऊन एका चिमुकलीचा जीव गेला़ गेल्या तीन दिवसांपासून ‘लोकमत’ने वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणावर मालिका सुरू आहे़ मात्र अद्याप वाहतूक शाखेला जाग आली नसून, शहरात बेशिस्त वाहतुकीला लगामच नाही़ वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोर कोणीही कोठूनही घुसतो़ मात्र त्याकडे पोलिसांचे दुर्लक्षच होत आहे़
मॅरॅथॉन स्पर्धेच्या सरावादरम्यान अपघात होऊन प्राची कोचेटा या लहान मुलीचा जीव गेला़ शहरातून बेफाम वेगात वाहने चालविली जातात़ वाहतुकीचे नियम तोडले जातात़ शिवाय, शहरातील चौकांमध्ये वाहतूक शाखेचे पोलीस दिसत नाही़ सिग्नलही बंद आहेत़ दोन सिग्नलचा अभाव वगळता अन्य सहा सिग्नल बंद आहेत़ मनपा म्हणते सिग्नल चालू आहेत, परंतु त्याचा वापर वाहतूक शाखेकडून होत नाही़ तर वाहतूक शाखेचे पोलीस म्हणतात केवळ दोन सिग्नल सुरू आहेत़ अन्य सहा सिग्नल नादुरूस्त आहेत़ त्यामुळे ते बंद आहेत़ दोन्हीही यंत्रणेची टोलवाटोलवी आहे़ परिणामी, वर्दळीच्या चौकांनीही वाहनधारक वाहने घुसवितात़ पोलीस यंत्रणेचा धाक नसल्यामुळे हे घडत आहे़ अवजड वाहनांना शहरातून बंदी आहे़ मात्र रस्त्यावर आणि चौकांमध्ये वाहतूक शाखेचे पोलीस नसल्याने अवजड वाहनेही जाताना दिसतात़