सत्यशोधक विवाह चळवळ गतिमान व्हावी : प्रतिमा परदेशी
By Admin | Updated: February 5, 2017 23:18 IST2017-02-05T23:13:51+5:302017-02-05T23:18:28+5:30
लातूर :भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात रविवारी तिसरे राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.

सत्यशोधक विवाह चळवळ गतिमान व्हावी : प्रतिमा परदेशी
लातूर : सत्यशोधक सहजीवन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक घरभरणी, सत्यशोधक राष्ट्रवाद याचा स्वीकार करणे हा मुक्ता साळवेंचा विचार प्रसारित होणे गरजेचे आहे. ब्राह्मणशाही फक्त पोथी-पुराणात, धार्मिक कर्मकांडातूनच व्यक्त होत नाही, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात ती शोषिकाची भूमिका वठविते, हे वास्तव मुक्ता साळवे यांनी आपल्या निबंधातून अधोरेखित केले असल्याचे मत मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी येथे व्यक्त केले.
भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात रविवारी तिसरे राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. रमेश पारवे, संयोजक प्राचार्य डॉ. माधव गादेकर, रमेश राक्षे, बी.पी. सूर्यवंशी, दशरथ सरवदे यांची उपस्थिती होती.
प्रा. परदेशी पुढे म्हणाल्या, मुक्ता साळवेंचा विचार प्रसारित करताना सत्य धर्माच्या प्रचार-प्रसारासोबत सत्यशोधक विवाहाची चळवळही गतिमान केली पाहिजे. ब्राह्मणी धर्माच्या शोषणाला, वर्चस्ववादाला रोखण्यासाठी सत्यशोधक सहजीवन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक घरभरणी, सत्यशोधक राष्ट्रवाद याचा विचार स्वीकारणे काळाची गरज आहे. मनुस्मृतीने कनिष्ठ जातींना ज्ञानाचा अधिकार नाकारला होता. जर कोणी ज्ञानार्जनाचा प्रयत्न केलाच, तर त्याचे मुंडके धडावेगळे केले जाई. वेद ऐकले तर तप्त शिस्याचा रस कानात ओतणे, पाहिले तर डोळे काढणे, वाचले तर जीभ हसाडणे यासारख्या शिक्षा मनुस्मृती देते. ज्ञानावरील ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान उभे राहू नये, यासाठी धर्मग्रंथ रचले गेले आणि दंडकही घालण्यात आले होते. मुक्ता साळवे याच इतिहासाची आठवण करून देते, असेही त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन दयानंद कांबळे यांनी केले. अशोक तोगरे यांनी आभार मानले. संमेलनाला अभ्यासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.
(आणखी वृत्त हॅलो / २ वर)