साताऱ्याच्या तिजोरीत साडेसात कोटी
By Admin | Updated: May 26, 2015 00:51 IST2015-05-26T00:35:11+5:302015-05-26T00:51:31+5:30
औरंगाबाद : मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई नगर परिषदेच्या तिजोरीत एकूण ७ कोटी ४६ लाख रुपयांची रक्कम निघाली

साताऱ्याच्या तिजोरीत साडेसात कोटी
औरंगाबाद : मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई नगर परिषदेच्या तिजोरीत एकूण ७ कोटी ४६ लाख रुपयांची रक्कम निघाली. समावेशामुळे ही रक्कम पालिकेकडे वर्ग झाली आहे. दरम्यान, महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी पालिकेच्या लेखा विभागाला पत्र देऊन साताऱ्यातील रक्कम तिथेच विकासकामांवर खर्च करावी, ती शहरातील कामांसाठी वळवू नये, असे निर्देश दिले.
मनपात पाच दिवसांपूर्वीच सातारा-देवळाई नगर परिषदेचा समावेश झाला. या समावेशानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली.
त्याबरोबरच नगर परिषदेच्या ठेवीही पालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. महापौर तुपे यांनी साताऱ्याच्या तिजोरीतील जमा रकमेची माहिती घेतली. तेव्हा तेथे ७ कोटी ४६ लाख रुपये असल्याचे आढळून आले. ही रक्कम साताऱ्यात विकासकामांवर खर्च करावी, तिचा वापर शहरातील इतर कामांसाठी करू नये यासाठी त्यांनी आज लेखा विभागाला तसे पत्र दिले. स्टेट बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, अॅक्सिस बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आदी बँकांमध्ये हा निधी जमा आहे.
२ कोटी २१ लाख रुपयांचा निधी १३ व्या वित्त आयोगातून मिळालेला आहे. १ कोटी १६ लाख रुपयांचा निधी दलित वस्ती सुधार कार्यक्रमात मिळाला आहे. तसेच नगरोत्थान महाअभियानांतर्गतही ७९ लाख रुपये मिळाले आहेत.
४याशिवाय साताऱ्यात काही दिवसांपूर्वी नगर परिषदेकडून अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू होती. या मोहिमेंतर्गत न्यायालयाच्या आदेशानुसार बिल्डरांनी नगर परिषदेकडे अनामत म्हणून जमा केलेल्या १ कोटी ६९ लाख रुपयांचाही समावेश आहे. तसेच कर भरणामधून मिळालेले ८३ लाख आणि रस्ते अनुदानाचे २ कोटी १४ लाख रुपयांचा वरील निधीत समावेश आहे.