सातारा-देवळाई न.प.व्हावी ‘मॉडेल’
By Admin | Updated: September 5, 2014 00:51 IST2014-09-05T00:26:28+5:302014-09-05T00:51:50+5:30
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद औरंगाबाद शहराचे उपनगर किंवा औरंगाबादच्या हद्दीला जोडून असणाऱ्या सातारा आणि देवळाई या ग्रामपंचायतींच्या गावाच्या विकासाचा डोलारा औरंगाबादच्या जिवावरच तयार झाला.

सातारा-देवळाई न.प.व्हावी ‘मॉडेल’
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद
जिल्ह्यातील ‘ब’ वर्गाची नवी नगर परिषद अस्तित्वात आली आहे. औरंगाबाद शहराचे उपनगर किंवा औरंगाबादच्या हद्दीला जोडून असणाऱ्या सातारा आणि देवळाई या ग्रामपंचायतींच्या गावाच्या विकासाचा डोलारा औरंगाबादच्या जिवावरच तयार झाला. शहरात घरे महाग झाली, त्याबरोबरच २० वर्षांपासून सातारा भागाकडे नागरिकांचा ओढा वाढला. तेथे बैठ्या घरांबरोबरच मोठमोठ्या इमारती आणि अपार्टमेंट, मोठे गृहप्रकल्प उभे राहिले. त्यातून अस्ताव्यस्तपणा वाढला. ग्रामपंचायतीला कारवाईचे अधिकार मर्यादित असल्याने वाट्टेल त्या पद्धतीने बांधकामे झाली.
राजकारणाच्या गाड्यातही ग्रामपंचायत अडकली. साताऱ्यानंतर देवळाई ग्रामपंचायतीच्या हद्दीत वस्ती वाढली. त्या भागातही नागरी वसाहती वाढल्या. नळाचे पाणी नसतानाही वस्त्या वाढल्या. या वाढीचा वेग इतका जोरकस होता की, दोन्ही ग्रामपंचायतींना काय नियोजन करावे हे सुचलेच नाही. त्यातून निर्माण झाला तो अनियंत्रित विकास. अरुंद रस्ते, नाल्यांवर झालेले बांधकाम, सार्वजनिक जागांचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था, साफसफाईचा अभाव या चक्रात ही दोन्ही गावे अडकल्याचे दिसते. त्यातून नगर परिषदेची मागणी झाली आणि ती बऱ्याच प्रयत्नांनंतर पूर्णही झाली. नगर परिषद आली तरी समस्या सोडविण्याचे आव्हान सातारा आणि देवळाईवासीयांसमोर उभे ठाकले आहे.
नागरिकांच्या दृष्टीने आता पाणी मिळणार का, रस्ते होणार का, नाले मोकळे होणार का हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याबाबत लोकमततर्फे आयोजित परिचर्चेत दोन्ही गावांतील कार्यकर्त्यांनी आणि प्रशासक म्हणून कारभार हाती आलेल्या तहसीलदार विजय राऊत यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली. सातारा आणि देवळाई नगर परिषद ‘मॉडेल’ तयार करण्याचा निर्धार या परिचर्चेत व्यक्त करण्यात आला. पहिले प्राधान्य राहील ते पाणी मिळविण्यासाठी. त्याबाबत तातडीने प्रशासकांसह जागरूक नागरिकांनी लक्ष घालण्याचे ठरविण्यात आले. याबरोबर प्रशासक विजय राऊत यांनीही पाणी मिळविण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील यासंबंधी विचार करून सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन यावेळी दिले. या चर्चेत दोन्ही गावांतील मान्यवरांनी सहभाग दर्शवून सातारा- देवळाई आदर्श नगर परिषद होण्याच्या दृष्टीने विविध सूचना केल्या.