औरंगाबाद : सातारा- देवळाईतील भूखंडमाफियांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. सिडकोच्या विकास आराखड्यातील आरक्षित खुले भूखंड प्लॉटिंग पाडून विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. तशाच तक्रारी सिडको प्रशासनाकडेदेखील प्राप्त होत आहेत. बेकायदेशीर प्लॉटिंगमुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सातारा- देवळाई हा परिसर मनपात की नगर परिषदेत; याचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तसेच झालर क्षेत्र आराखड्यातून ही दोन गावे वगळण्याबाबत सिडकोने मुख्यालयाकडे पत्रव्यवहार केला असला तरी त्यावरही अजून काही निर्णय झालेला नाही. या सगळ्या गदारोळात भूमाफियांचे फावत आहे. एनए मंजुरी न घेताच व सिडकोने आरक्षित केलेल्या जागेवर प्लॉटिंग करून ती विक्री होत आहे. सरत्या वर्षात बोटावर मोजण्याइतक्या रेखांकनाला एनएची मंजुरी देण्यात आलेली आहे. भूमाफियांकडून प्लॉट विक्रीमध्ये फसवणूक झाल्याच्या सुमारे २०० तक्रारी पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्याने त्या भागातील प्लॉट विक्रीला बे्रक लागला होता. पोलीस आणि प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईच्या धास्तीने माफियांनी प्लॉट विक्री थांबवली; परंतु मागील काही दिवसांपासून ती टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, बेकायदा ले-आऊटच्या आधारे मोकळे भूखंड विक्रीचा सपाटा सुरू आहे. सातारा- देवळाईचा झालर क्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्यात आल्यामुळे सिडकोने त्या भागासाठी स्वतंत्र डीपी प्लॅन तयार केला. या विकास आराखड्यात नवीन रस्ते सुचविण्यात आले होते. तोच आराखडा मनपानेही विचारात घेण्याचे निश्चित केले होते. तहसीलदार रमेश मुनलोड यांनी आवाहन केले की, सातारा- देवळाईतील एनए व ले-आऊटची मंजुरी नसलेले प्लॉट नागरिकांनी खरेदी करू नयेत. त्या प्लॉटची सातबारा व फेरफारवर नोंद घेतली जाणार नाही. सिडकोचा विकास आराखडा पाहून आणि मंजूर एनए- ले-आऊटच्या कागदपत्रांची तपासणी करूनच प्लॉटची खरेदी करावी.
भूमाफियांचा सातारा व देवळाईत हैदोस
By admin | Updated: December 28, 2015 00:25 IST