‘सेट’ला मिळाले यूजीसीकडून ‘ग्रीन सिग्नल’
By Admin | Updated: April 16, 2015 01:01 IST2015-04-16T00:04:53+5:302015-04-16T01:01:59+5:30
औरंगाबाद : दीड वर्षापासून रखडलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेला (सेट) ‘यूजीसी’कडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

‘सेट’ला मिळाले यूजीसीकडून ‘ग्रीन सिग्नल’
औरंगाबाद : दीड वर्षापासून रखडलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेला (सेट) ‘यूजीसी’कडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास ‘सेट’साठी ‘नोडल एजन्सी’ म्हणून पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली असून, वर्षातून दोन परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय या विद्यापीठाने घेतला आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांतील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यूजीसीमार्फत अधिव्याख्यातापदासाठी राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) आणि राज्यस्तरीय पातळीवर ‘सेट’ अशा दोन पात्रता परीक्षा घेतल्या जातात. वर्षातून दोन वेळा होणाऱ्या या परीक्षांपैकी ‘नेट’ ही इंग्रजी आणि हिंदी भाषेत, तर ‘सेट’ ही सर्व प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाते. अनेक राज्यांतील विद्यार्थ्यांचे पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण हे प्रादेशिक भाषांमधून झालेले असते. त्यामुळे त्यांना इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून ‘नेट’ देणे कठीण जाते. त्यावर यूजीसीने पर्याय म्हणून १९९५ पासून ‘सेट’ सुरू केली होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला १९९५ पासून ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्त केले होते.
यासंदर्भात ‘सेट’ विभागाचे सहायक कुलसचिव राजेश राहेरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पुणे विद्यापीठाला ५ वर्षांसाठी ‘नोडल एजन्सी’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर प्रत्येक वेळा ५-५ वर्षांची मुदतवाढ मिळाली. त्यानुसार दोन्ही राज्यांत २०१३ पर्यंत नियमितपणे ‘सेट’चे आयोजन केले. १ डिसेंबर २०१३ पासून मुदतवाढीस मान्यता मिळालेली नव्हती म्हणून तब्बल दीड वर्ष ‘सेट’ रखडली होती. मुदतवाढीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रयत्न केल्यानंतर नुकतेच ‘यूजीसी’ने या विद्यापीठाला मुदतवाढीचे पत्र दिले आहे. आतापर्यंत ३० विषयांची एक परीक्षा घेतली जात होती. यापूढे ती ३२ विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. नोडल एजन्सी म्हणून पुणे विद्यापीठाला नुकतीच मुदतवाढ मिळाली. त्यानुसार विद्यापीठाने ‘सेट’ घेण्याबाबत नियोजन सुरू केले आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा घेतली जाईल. मेमध्ये सेटची जाहिरात निघेल.
शिवाय उर्दू व फॉरेन्सिक सायन्स या विषयांची ‘सेट’ घेण्यास पहिल्यांदाच मान्यता दिलेली आहे, असे विभागाचे सहायक कुलसचिव राजेश राहेरकर यांनी कळविले.