सासुरवाडीस यायचा अन् गुन्हे करून जायचा

By Admin | Updated: June 11, 2016 00:04 IST2016-06-10T23:47:57+5:302016-06-11T00:04:30+5:30

औरंगाबाद : औरंगाबादला सासुरवाडीस यायचे अन् जाता - जाता वाहन चोऱ्या किंवा अन्य काही तरी गंभीर गुन्हा करून पुन्हा गावी निघून जायचे, अशा पद्धतीने गुन्हे करणारा कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला.

Sasurwadi came and went to crime | सासुरवाडीस यायचा अन् गुन्हे करून जायचा

सासुरवाडीस यायचा अन् गुन्हे करून जायचा

औरंगाबाद : औरंगाबादला सासुरवाडीस यायचे अन् जाता - जाता वाहन चोऱ्या किंवा अन्य काही तरी गंभीर गुन्हा करून पुन्हा गावी निघून जायचे, अशा पद्धतीने गुन्हे करणारा कुख्यात गुन्हेगार अजय बंडू काळे (२०, रा. नागफणी, नेवासा, अहमदनगर) अखेर काल मुकुंदवाडी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या ताब्यातून औरंगाबादेतून चोरी केलेल्या १३ दुचाकी आतापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नगर जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार अजय काळे याची औरंगाबादेतील मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील राजनगरात सासुरवाडी आहे. सध्या तो तेथे आलेला असून, त्याने औरंगाबादेतून अनेक वाहने चोरी केलेली आहेत, अशी माहिती एका खबऱ्याकडून मुकुंदवाडीचे फौजदार कल्याण शेळके यांना मिळाली. माहिती मिळताच निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शेळके, जमादार कौतिक गोरे, प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, कैलास काकड, विष्णू हागवणे यांनी काल रात्री राजनगर गाठले आणि अजयच्या सासुरवाडीच्या घरावर छापा मारला. त्यावेळी अजय तेथे पोलिसांना सापडला.
या घराच्या आवारातच पोलिसांना ११ पल्सर मोटारसायकली, १ बुलेट आणि १ स्प्लेंडर, अशा एकूण १३ दुचाकी सापडल्या. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच आरोपी अजयने या सर्व दुचाकी चोरीच्या असल्याची स्पष्ट कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. या सर्व दुचाकी त्याने दौलताबाद, सिडको, मुकुंदवाडी आणि जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्या असल्याचे नंतर तपासात समोर आले. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा आरोपी अधूनमधून नेवाशाहून सासुरवाडीस यायचा. येथे आला की एक- दोन दिवस मुक्काम ठोकायचा. या कालावधीत तो वाहन चोऱ्या किंवा इतर गुन्हे करायचा आणि मग पुन्हा गावी निघून जायचा, अशा पद्धतीने त्याने अनेक गुन्हे केले आहेत.
आरोपी अजय हा अहमदनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध जळगाव, बुलडाणा पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असून, त्या गुन्ह्यांमध्येही तो पोलिसांना हवा असल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.
आरोपी अजयचा भाऊही अट्टल गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांना पकडण्यासाठी नेवासाचे सहायक निरीक्षक गेले. तेव्हा या दोघांनी चक्क सहायक निरीक्षकांवर रिव्हॉल्व्हर रोखून तेथून धूम ठोकली होती. त्या गुन्ह्यातही अजय वाँटेड असल्याचे चौकशीत समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलीस पकडायला आले की त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखायचे किंवा फायरिंग करायची, अशा सवयीचा हा आरोपी असल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले. या आरोपीकडे असलेल्या दोन्ही रिव्हॉल्व्हर काही दिवसांपूर्वीच नेवासा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथकाने अट्टल गुन्हेगार अजय काळे यास जेरबंद केले आणि त्याच्याकडून चोरीच्या तब्बल १३ दुचाकी जप्त केल्याचे कळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पथकास ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. या पथकाचा लवकरच सत्कार केला जाणार आहे.

Web Title: Sasurwadi came and went to crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.