सरपंचपदाचा अर्जच आॅनलाईनवर उपलब्ध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:47 IST2017-09-05T00:47:40+5:302017-09-05T00:47:40+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे भावी सरपंच सोमवारचा मुहूर्तावर लव्याजम्यासह आॅनलाईन केंद्रांवर धडकले मात्र सरपंचपदाचा फॉर्म किंवा कोणती माहिती आॅनलाईनवर उपलब्ध नव्हती. तहसील कार्यालयातही यासंदर्भात माहिती नव्हती. त्यामुळे भावी सरपंचांचा पहिलाच दिवस वायफळ गेला व हिरमोड झाल्याचे चित्र आहे.

सरपंचपदाचा अर्जच आॅनलाईनवर उपलब्ध नाही
चंद्रकांत देवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे भावी सरपंच सोमवारचा मुहूर्तावर लव्याजम्यासह आॅनलाईन केंद्रांवर धडकले मात्र सरपंचपदाचा फॉर्म किंवा कोणती माहिती आॅनलाईनवर उपलब्ध नव्हती. तहसील कार्यालयातही यासंदर्भात माहिती नव्हती. त्यामुळे भावी सरपंचांचा पहिलाच दिवस वायफळ गेला व हिरमोड झाल्याचे चित्र आहे.
वसमत तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंचपद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडल्या जाणार असल्याने भावी सरपंचांची संख्याही प्रचंढ वाढलेली आहे. आॅनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. अर्ज भरण्यासाठीची कमी कालावधी, सण, सुट्या व आॅनलाईनचे सर्व्हर डाऊन होण्याच्या परंपरेमुळे पहिल्या दिवसांपासून अर्ज भरण्याची तयारी सर्वांची होती.
गावोगावचे भावी सरपंच तर सोमवारी सकाळीच आपापल्या गावातील ग्रामदेवतेला नारळ फोडून लवाजम्यासह वसमतला धडकले. तहसील कार्यालयात निवडणूक विभागाकडे सरपंचपदासाठी अनामत रक्कम भरण्यासाठी गेले तर ती किती हेच निवडणूक विभागाला माहीती नव्हते. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठीही आॅनलाईनच्या साईडवर सरपंचपदाचे फॉर्म उपलब्ध नाहीत. दिवसभर वसमतमध्ये तळ ठोकून बसलेले भावी सरपंच हतबल झाले असल्याचे पहावयास मिळाले.
भरीसभर सोबत आणलेला लव्याजम्याचा खर्चही भावी सरपंचावरच पॅनलमधील सदस्यांचाही भार पॅनलप्रमुख म्हणजेच भावी सरपंचावरच. त्यामुळे ‘खाया पिया कुछ नही, गिलास फुटा बाराणा’ अशीच अवस्था झाली. अर्ज भरण्यासाठी काढलेला मुहूर्त व फोडलेला नारळही वाया गेला तो वेगळाच. या प्रकारासंदर्भात अनेकांनी निवडणूक विभागात धाव घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर तिथेच काही माहिती नसल्याने तुम्हीच निवडणूक विभागाशी संपर्क साधा आणि नक्की काय ते शोधा अशाही सूचना ऐकावयास मिळाल्याचे काही जणांनी सांगितले.
या प्रकरणी नायब तहसीलदार सचिन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पहिल्यांदाच सरपंचपद जनतेतून निवडल्या जात आहे. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरू असेल. त्यामुळे आज सॉफ्टवेअरमधील दुरूस्तीसाठी सरपंचपदासंदर्भातील माहिती व आॅनलाईनसाठीचा फॉर्म उपलब्ध झालेला नसावा, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमधील बदलाच्या प्रक्रियेमुळे अर्ज भरण्याचा पहिला दिवस तर वाया गेला आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने सरपंचपदासाठी आता अर्ज भरण्याची मुदतही एक दिवसाने वाढवून देण्याची मागणी अनेक भावी सरपंचांनी केली आहे. मुदतीनंतर एक मिनीट उशिराही जर अर्ज स्वीकारले जात नसतील तर आमचा एक दिवस कमी झाला. त्याची भरपाई कोणी करावी, असा युक्तिवादही होत आहे.