फुलंब्री : विभागीय आयुक्तांच्या नावाने दे ग माय, जिल्हाधिकारी यांच्या नावाने दे ग माय,असे म्हणत गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर आज सकाळी ११ वाजेपासून 'भीक मागो' आंदोलन सुरू केले आहे. विविध योजनेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत, त्यांना तत्काळ रक्कम द्यावी, अशी मागणी साबळे यांनी केली.
फुलंब्री पंचायत समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक सिंचन विहीर, गाय गोठा, घरकुल योजनाच्या कामाचे पैसे मागील सहा महिन्यापासून मिळत नसल्याने शेतकरी, लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांना तत्काळ पैसे देण्यात यावे अशी मागणी करत सरपंच मंगेश साबळे यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून भीक मागो आंदोलन सुरू केले. यावेळी साबळे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, बिडीओ, इंजिनिअर यांच्या नावे हातात भिक्षा पात्र घेऊन भीक मागितली. जमा झालेली भिकेची रक्कम अधिकाऱ्यांना देणार असल्याचे साबळे म्हणाले.
नेहमीच विविध विषयांवर आंदोलन करून चर्चेत राहात असलेल्या मंगेश साबळे यांनी गुरुवारी फाटलेले कपडे घालून, तुटलेली खुर्ची पाठीवर बाधत, हातात भिक्षा पात्र घेऊन भिकाऱ्याचा वेश करून भीक मागितली. कार्यालयात येणाऱ्या अनेक लोकांनी त्यांना भिकारी समजून सुट्टे पैसे दिले. बालविकास प्रकल्प अधिकारी मनीषा कदम यांनी पैसे घेऊन अंगणवाडी मदतसीस यांची भरती केल्याचा आरोप साबळे यांनी केला.