सर्जाराजाला पूरणपोळी अर्ध्या जिल्ह्यात पोळा उत्साहात
By Admin | Updated: September 1, 2016 01:15 IST2016-09-01T00:50:13+5:302016-09-01T01:15:44+5:30
लातूर : प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या सर्जाराजाच्या वर्षभरातील कामाची उतराई म्हणून पोळ्यानिमित्त मनोभावे पूजा करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून

सर्जाराजाला पूरणपोळी अर्ध्या जिल्ह्यात पोळा उत्साहात
लातूर : प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या सर्जाराजाच्या वर्षभरातील कामाची उतराई म्हणून पोळ्यानिमित्त मनोभावे पूजा करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून बुधवारी अर्ध्या जिल्ह्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तर अर्ध्या जिल्ह्यात हा सण गुरुवारी साजरा केला जात आहे. यंदा अमावस्येला बुधवारी दुपारी प्रारंभ झाला. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत पोळा सण साजरा होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती होती. परंतु, यावर्षी काही प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीची सजावट करून गावातील मंदिरांसमोर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आपल्या घरासमोरील प्रांगणात कुटुंबियांसमवेत मनोभावे पूजा केली. बैलजोडीला पूरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून ‘जुनं ते सोनं, नव्या संसाराचं लेणं’ असणारा बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला. काही गावांमध्ये गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आपल्या बैलजोडीचे मनोभावे स्वागत केले. (प्रतिनिधी)
अमावस्येची सुरुवात बुधवारी दुपारपासून झाली असल्याने जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांनी बुधवारी बैलपोळा सण साजरा केला. तर उर्वरित ठिकाणी गुरुवारी दुपारपर्यंत पोळा सण साजरा करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून बैलजोडीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर काही गावांमध्ये बैलजोडी सजावटीच्या स्पर्धा घेऊन उत्कृष्ट बैलजोडीला पारितोषिक देऊन पोळ्याचा सण साजरा केला.