फटाक्यांच्या आवाजामुळे पसरला भाजपत सन्नाटा

By Admin | Updated: September 12, 2014 00:05 IST2014-09-11T23:53:43+5:302014-09-12T00:05:03+5:30

हिंगोली : भाजपची उमेदवारी अजून कोणाला मिळाली हे जाहीर झाले नसले तरी आडगाव, कनेरगाव व हिंगोलीत फुटलेल्या फटाक्यांच्या आवाजाने काही जणांना कानठळ्याच बसल्या आहेत.

Sarkar BJP spread due to crackers | फटाक्यांच्या आवाजामुळे पसरला भाजपत सन्नाटा

फटाक्यांच्या आवाजामुळे पसरला भाजपत सन्नाटा

हिंगोली : भाजपची उमेदवारी अजून कोणाला मिळाली हे जाहीर झाले नसले तरी आडगाव, कनेरगाव व हिंगोलीत फुटलेल्या फटाक्यांच्या आवाजाने काही जणांना कानठळ्याच बसल्या आहेत. त्यामुळे भाजपात एक वेगळाच सन्नाटा पसरला असून उमेदवारी जाहीर झाली की काय? अशी विचारणा होत आहे. काहींनी तर तक्रारीचाच सूर आळवला आहे.
भाजपात कधी नव्हे, एवढी सध्या उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. ज्यांच्या नावामागे थोडेही वलय आहे, अशांना थेट आमदार झाल्याचीच स्वप्ने पडत आहेत. त्यातच लोकसभेतील यश अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना खुणावत आहे. घरचे झाले थोडे अन् व्याहाने धाडले घोडे या उक्तीचा प्रत्ययही मूळ भाजपकरांना येत आहे.
मागील निवडणुकीत भाजपला निसटता पराभव पत्करावा लागला होता. यावेळी इच्छुकांची संख्या वाढल्याने सर्वांनाच हा फरक कमी होईल, असे वाटत होते. मात्र त्यासाठी हवी असलेली एकी बेकीत परावर्तीत होत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे आल्या. काहीजणांना व्यासपीठाच्या कोपऱ्यावरही स्थान मिळाले नाही. ही नाराजी वाऱ्यासारखी पसरली. हा किस्सा चर्चाविरामात जातो न जातो तोच आता उमेदवारीच्या फटाक्यांची चर्चा रंग धरू लागली. काहीजण जाहीरपणे त्यावर बोलू लागले आहेत. अजून पक्षाने कुणालाही अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली नसताना फटाके फुटलेच कसे ? असा सवाल केला जात आहे. त्यासाठी काहींनी पक्षश्रेष्ठींकडेही तक्रार केली. माध्यमांपर्यंत ही चर्चा पोहोचेल, अशी व्यवस्थाही करण्यासाठी भाजपाच्या गोटातीलच काहींनी प्रयत्न चालविले. मात्र उघडपणे कोणी बोलायला तयार नाही. यामागे काहीतरी षडयंत्र आहे, एवढी बोलकी प्रतिक्रिया दिली जात आहे. परंतु नाराजीचा सूर वेगळे वळण घेईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपाच्या या फटाकेबाजीमुळे खदखद असली तरी वरवरची शांतता आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Sarkar BJP spread due to crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.