मनपात सत्तेचा सारिपाट सुरू
By Admin | Updated: April 26, 2015 01:03 IST2015-04-26T00:59:37+5:302015-04-26T01:03:03+5:30
औरंगाबाद : शिवसेना, भाजप, एमआयएम आणि काँगे्रसने महापौर, उपमहापौरपदासाठी आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले

मनपात सत्तेचा सारिपाट सुरू
औरंगाबाद : शिवसेना, भाजप, एमआयएम आणि काँगे्रसने महापौर, उपमहापौरपदासाठी आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले. सर्वच राजकीय पक्षांनी महापौरपदासाठी आवश्यक असलेल्या ५७ सदस्यांच्या बहुमताचा दावा केल्यामुळे २९ रोजी काय चमत्कार होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने त्र्यंबक तुपे यांना महापौरपदाचा उमेदवार निश्चित केले आहे. त्यांनी आज खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. मनोज बल्लाळ, मनोज गांगवे सूचक तर नितीन साळवी, आशा भालेराव त्यांच्या अर्जावर सूचक व अनुमोदक आहेत. भाजपकडून राजू शिंदे यांनी आ. अतुल सावे यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठी अर्ज भरला असून, त्यांचे भगवान घडमोडे, मनीषा मुंडे सूचक तर रामेश्वर भादवे, शिवाजी दांडगे अनुमोदक आहेत. काँग्रेसकडून अफसर खान यासीन खान यांनी अर्ज भरला असून अब्दुल मोहंमद नावीद अब्दुल रशीद, अनिता साळवे सूचक व अनुमोदक आहेत. एमआयएमकडून गंगाधर ढगे यांनी आ. इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. त्यांचे सय्यद मजीद रशीद सूचक तर जहागीरदार मोहंमद अब्दुल गुलाम जिलानी अनुमोदक आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपकडून प्रमोद राठोड यांनी अर्ज भरला आहे. पूनम बमणे, दिलीप थोरात, कमल नरोटे, बबिता चावरिया त्यांना सूचक व अनुमोदक आहेत. एमआयएमकडून सिद्दीकी नासेर तकीयोद्दीन यांनी अर्ज भरला असून शेख जफर अख्तर, नाईकवाडी अब्दुल रहीम शेख व खान फेरोज मोईनोद्दीन खान यांनीही उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. कैलास गायकवाड यांनी रमेश जायभाये सूचक व ज्योती अभंग यांच्या अनुमोदनाने अर्ज भरला, तर भाऊसाहेब जगताप यांनी काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी अब्दुल मोहंमद नावीद अब्दुल रशीद, अनिता साळवे या सूचक , अनुमोदकाच्या स्वाक्षरीने अर्ज भरला. भाजपने महापौरपद अडीच वर्षांसाठी मागितले असून पहिली संधी भाजपला मिळावी, असा आग्रह धरला आहे; परंतु सेनेने भाजपची मागणी फेटाळली आहे. पालकमंत्री रामदास कदम आणि प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यात महापौरपदावरून मुंबईत झालेली बैठक निष्फ ळ ठरली आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले, भाजपने मागणी केली आहे; परंतु अजून काहीही निर्णय झालेला नाही, तर आ.अतुल सावे म्हणाले पदाबाबत काही निर्णय झालेला नाही. मुंबईतील बैठकीतही निर्णय न झाल्यामुळे अर्ज भरला.