जिल्ह्यात संततधार; जलसाठे जोत्याखालीच
By Admin | Updated: August 3, 2016 00:17 IST2016-08-03T00:05:48+5:302016-08-03T00:17:27+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात संततधार तर अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दोन दिवसांची झड अनेक वर्षांनंतर नागरिक अनुभवत असून

जिल्ह्यात संततधार; जलसाठे जोत्याखालीच
औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात संततधार तर अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दोन दिवसांची झड अनेक वर्षांनंतर नागरिक अनुभवत असून, गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. पावसामुळे अनेक लहान-मोठ्या नद्यांना पूर आला आहे.
फुलंब्री : तालुक्यात मंगळवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेली संततधार सुमारे सहा तास सुरू होती. पावसाने जलसाठ्यात वाढ झालेली असली तरी सततच्या पावसाने मका पिवळा पडत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मंगळवारी सकाळी ९ वाजता पाऊस पडण्यास सुरुवात झाली. तीन वाजेपर्यंत सतत पडला होता. फुलंब्री येथील आठवडी बाजारात आलेल्या व्यापाऱ्याची फजिती झाली. कारण या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. त्यात पावसाने चिखल झाला. सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत मोजकेच ग्राहक बाजारात दिसत होते, तर अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून घरी जाणेच पसंत केले.
फुलंब्री टी पॉइंटवर व खुलताबाद रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते .रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी जाण्याची व्यवस्था केली नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर होते. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत सुमारे ३१९ मी.मि. पाऊस पडला. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. सततच्या पावसाने पाणी शेतात तुंबत असल्याने अनेक भागांतील जमिनी चिभडत आहेत.
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात सर्वत्र यावर्षी रिमझिम पाऊस झाला. दिसायला पाऊस ३२२.१३ मि.मी.पाऊस झाला असला तरी तालुक्यातील सर्व धरणे अजूनही कोरडी आहेत.
पिकांसाठी आवश्यक पाऊस पडल्याने पिके डोलत असली तरी मोठा पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम सतावणार आहे.
सिल्लोड तालुक्यात मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. सिल्लोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खेळणा धरणात अजूनही मृत साठा आहे.
याशिवाय उंडणगाव,रहिमाबाद धरणात मृत साठा आहे. अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्पात १५.६८ % पाणी साठा आहे, तर केळगाव मध्यम प्रकल्पात २३.७३% पाणी साठा
आहे.
मंडळनिहाय पडलेला पाऊस
सिल्लोड तालुक्यात यावर्षी जुलैअखेर सर्वात जास्त सिल्लोड शहरात ४१५ मि.मी.पाऊस झाला, तर सर्वात कमी २०० मि.मी. बोरगाव बाजार मंडळात पाऊस झाला
आहे.
अजिंठा मंडळात ३२७ मि.मी., आमठाणा २८९, गोळेगाव २६३,निल्लोड २९७, पाऊस झाला आहे.
मागील वर्षी जुलैपर्यंत १८३ मि.मी.पाऊस झाला होता. त्यात सिल्लोड मध्ये १६२ मि.मी.,भराडी १८८ मि.मी., अंभई ३५६ मि.मी.,अजिंठा १५५ मि.मी.,आमठाणा २२३ मि.मी., गोळेगाव ११६ मि.मी., निल्लोड १८६ मि.मी., बोरगाव बाजार १६६ मि.मी. पाऊस झाला होता.
त्या तुलनेत यावर्षी जुलैपर्यंत ३२२ मि.मी. म्हणजे चांगला पाऊस झाला आहे. ३२२ मि.मी. झालेल्या पावसाने जमिनीचे पोट भरून विहिरींना पाझर फुटला आहे. जमिनीची पाणी पातळी काही अंशी वाढली आहे.
कन्नड : तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. मात्र, हलक्या स्वरूपाचा संततधार पाऊस असल्याने नद्यांना मोठे पूर आले नाहीत. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला असला तरी हलक्या सरींबरोबर मधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे; त्यामुळे धरणांमधील मृत पाणीसाठ्यांमध्ये फक्त भर पडत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात भर पडलेली असली तरी अजूनही मृतसाठाच आहे. धरणात सुरू असलेली आवक पाहता मंगळवारी रात्रीतून मृतसाठा ओलांडून उपयुक्त जलसाठ्यास सुरुवात होईल, असे कालवा निरीक्षक जे.डी. जैस्वाल यांनी सांगितले. तालुक्यातील इतर जलसाठ्यांच्या पाणीपातळीची माहिती मिळू शकली नाही.
तालुक्याची वार्षिक सरासरी ७४९ मि.मी. आहे. यावर्षी आतापर्यंत तालुक्यात सरासरी ३४३.३६ पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस चापानेर (२६० मि.मी.) व चिकलठाण (२६१ मि.मी.) या महसूल मंडळात पडला असून सर्वात जास्त पाऊस कन्नड (४०९ मि.मी.) महसूल मंडळात झाला आहे. त्याखालोखाल देवगाव (४०७ मि.मी.), पिशोर ३०३, नाचनवेल ३८३, करंजखेडा ३७४ व चिंचोली ३६० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.