संस्थान गणपती दिसणार मूळ रूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:04 IST2021-05-17T04:04:01+5:302021-05-17T04:04:01+5:30
धार्मिक : वज्रलेपन विधीला आजपासून सुरुवात औरंगाबाद : शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या मूळ रूपाचे दर्शन होण्याचा योग भाविकांच्या ...

संस्थान गणपती दिसणार मूळ रूपात
धार्मिक : वज्रलेपन विधीला आजपासून सुरुवात
औरंगाबाद : शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या मूळ रूपाचे दर्शन होण्याचा योग भाविकांच्या कुंडलीत जुळून आला आहे. सोमवारपासून (दि.१७) श्रीच्या मूर्तीचे वज्रलेपन करण्यात येत आहे. ग्रामदैवताची मूळ मूर्ती कशी असेल, याची उत्सुकता भविकांमध्ये निर्माण झाली आहे.
राजाबाजारातील संस्थान गणपतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार १९८८ मध्ये करण्यात आला होता. त्या आधी १९७१ मध्ये संस्थान गणपतीचे मूळ रूप भविकांनी पाहिले होते. नंतर मूर्तीवर शेंदूरचा थरावरथर जमत गेला. आता पहिल्यांदाच गणपतीचे वज्रलेपण विजय पिंपळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात १७ मेपासून होईल. अघोर होम करून वज्रलेपणाला सुरुवात करण्यात येईल. मूर्तीवरील शेंदुराचा थर काढण्यात आल्यावर गणपतीचे मूळ रूप भाविकांना दिसेल. दि.१८ ते २३ मेपर्यंत मंदिरातच बाप्पांना तेज कलशामध्ये ठेवण्यात येईल. यामुळे भाविकांना मूर्तीचे दर्शन २३ मेपर्यंत होणार नाही, पण रोज नियमाप्रमाणे सकाळ व संध्याकाळ आरती होईल. २४ मे रोजी पुण्याहवाचन, २५ मे रोजी अग्नि स्थापन, २६ रोजी गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि पूर्णाहुती होईल. २८ रोजी सहस्रआवर्तन होतील आणि २९ मे रोजी संकष्ट चतुर्थीला संस्थान गणपतीच्या मूर्तीच्या मूळ रूपाचे सर्वांना दर्शन घडेल, अशी माहिती संस्थान गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
कॅप्शन
ग्रामदैवत संस्थान गणपती मूर्तीच्या मूळ रूपाचा १९७१ मध्ये काढलेला फोटो.