वडवळ, हत्तीबेटाच्या वनौषधींना ‘संजीवनी’
By Admin | Updated: September 30, 2014 01:26 IST2014-09-30T00:05:32+5:302014-09-30T01:26:31+5:30
उदगीर : चाकूर तालुक्यातील वडवळ व उदगीर तालुक्यातील हत्तीबेट वनौषधींनी समृद्ध आहेत़ मात्र या बेटांवरील वनौषधींचे संशोधन शासकीय यंत्रणेकडून होत नव्हते़

वडवळ, हत्तीबेटाच्या वनौषधींना ‘संजीवनी’
उदगीर : चाकूर तालुक्यातील वडवळ व उदगीर तालुक्यातील हत्तीबेट वनौषधींनी समृद्ध आहेत़ मात्र या बेटांवरील वनौषधींचे संशोधन शासकीय यंत्रणेकडून होत नव्हते़ त्याअनुषंगाने नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेऊन बेटांवरील वनौषधींचे संशोधन सुरु केले आहे़
उत्तरा नक्षत्रात वडवळ व हत्तीबेटांवर वैद्यांची अन् रुग्णांची गर्दी होत असते़ या बेटांवर दुर्मिळ वनौषधींचा खजिना आहे़ परंतु, या औषधीचे शास्त्रोक्त पद्धतीने संशोधन करण्यात आले नव्हते़ येथे संशोधन झाल्यास अनेक दुर्मिळ वनस्पती समोर येतील़ त्याअनुषंगाने परवाच नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़अरुण जामकर व कुलसचिव डॉ़ काशिनाथ गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखालील एका समितीने दोन्ही बेटांना भेट देऊन नमुने सोबत नेले आहेत़ त्यांनी येथील वनौषधी, माती, खडकाचे निरीक्षण करुन जैव रासायनिक परीक्षणासाठी नमुने घेतले़ या समितीत विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ़यशवंत पाटील, आयुष विभागाचे प्रतिनिधी डॉ़प्रदीप आवळे, प्राचार्य डॉ़दत्ता पाटील, डॉ़दिगंबर चोथे, डॉ़मदन टोंगे, प्रा़एस़मोहन, प्रा़मुलानी, प्रा़अमोल शिरफुले, डॉ़एस़आऱ श्रीगिरे, डॉ़नारायण जाधव, डॉ़प्रशांत बिरादार हे सहभागी झाले होते़ ही समिती आता सोबत नेलेल्या नमुन्यांची तपासणी करुन त्याचा अहवाल विद्यापीठास सादर करणार आहेत़ (वार्ताहर)