रांजणगावच्या सरपंचपदी संजीवनी सदावर्ते बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 17:45 IST2018-12-17T17:44:32+5:302018-12-17T17:45:41+5:30
रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीच्या सोमवारी आयोजित विशेष सभेत सरपंचपदी संजिवनी दीपक सदावर्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

रांजणगावच्या सरपंचपदी संजीवनी सदावर्ते बिनविरोध
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीच्या सोमवारी आयोजित विशेष सभेत सरपंचपदी संजिवनी दीपक सदावर्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गत चार महिन्यापासून सरपंचपदाच्या निवडीवरुन सुरु असलेल्या नाट्याला पुर्णविराम मिळाला असून, या ग्रामपंचायतीवर आ.प्रशांत बंब यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
अलिखित करार न पाळला गेल्याने १३ ग्रामपंचायत सदस्यांनी ३१ जुलै रोजी सरपंच मंगलबाई लोहकरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्ताववर चर्चेसाठी ६ आॅगस्टला ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली. यात सरपंच लोहकरे यांच्याविरुध्द अविश्वास प्रस्ताव बहुमताने पारित करण्यात आला. त्यावर सरपंच लोहकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी त्यांचे अपील फेटाळले. रिक्त झालेल्या सरपंच पद निवडीसाठी सोमवारी सभा घेण्यात आली. दरम्यान, संजीवनी सदावर्ते यांचा एकमवे अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी एस.एस.भदाणे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सहायक म्हणून तलाठी राहुल वंजारे व ग्रामविकास अधिकारी एस.एन.रोहकले यांनी काम पाहिले. या सभेला मावळत्या सरपंच मंगलबाई लोहकरे, उपसरपंच मोहनीराज धनवटे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सोनवणे, अशोक जाधव, दत्तु हिवाळे, नंदाताई बडे, कांचन पा.कावरखे, संजीवनी सदावर्ते, रुख्मिणी खंदारे, ज्ञानेश्वर वाकचौरे, भिमराव किर्तीकर, अशोक शेजुळ, योगिता महालकर, कांताबाई जाधव, शिवराम ठोंबरे, जयश्री कोळेकर, मिरा तौर आदींची उपस्थिती होती. यानिवडीनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जल्लोष केला.