संजय वाघचौरे यांना निवडणूक कठीण

By Admin | Updated: July 29, 2014 01:13 IST2014-07-29T00:49:34+5:302014-07-29T01:13:33+5:30

रफिक पठाण, जायकवाडी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे गाजर दाखवून आमदारकी पदरात पाडून घेणाऱ्या आ. संजय वाघचौरे यांनीच या योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप

Sanjay Waghchoure is a tough choice for the election | संजय वाघचौरे यांना निवडणूक कठीण

संजय वाघचौरे यांना निवडणूक कठीण

रफिक पठाण, जायकवाडी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे गाजर दाखवून आमदारकी पदरात पाडून घेणाऱ्या आ. संजय वाघचौरे यांनीच या योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप होत असून आगामी विधानसभा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
गेल्या साडेचार वर्षांच्या काळात पैठण तालुक्यात बोटावर मोजण्याइतकी विकासाची कामे झाली. काम थोडे आणि गाजावाजाच जास्त, असाच काहीसा प्रकार वाघचौरेच्याबाबतीत होत आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने आ. संजय वाघचौरे यांनी ‘लक्ष्य-२०१४’ या नावाखाली पैठण तालुक्यातील ६० गावांत मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीसाठी दौरा सुरू केला. वाघचौरे यांना अगदी नगण्य प्रतिसाद मिळत असून, उलट नागरिकांच्या प्रश्नांच्या भडीमाराला सामोरे जावे लागत आहे. दौऱ्यात आ. वाघचौरेयापूर्वी झालेल्या विकासकामांचेदुसऱ्यांदा उद्घाटन करीत असल्याने ग्रामस्थही बुचकळ्यात पडले आहेत.
२००९ च्या विधानसभेच्या तोंडावर पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या २२२ कोटी रुपये खर्चाच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन टप्पा क्र. २ ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी देऊन त्याचे उद्घाटन केले. या योजनेच्या मुद्यावर संजय वाघचौरे यांना आमदारकी मिळाली. परंतु गेल्या पावणेपाच वर्षांच्या काळात या योजनेसाठी आ. वाघचौरे यांनी काहीच केले नाही. शेतकऱ्यांच्या शेतात पाईपलाईनसाठी केवळ खड्डे खोदून ठेवले. शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही.
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन टप्पा क्रमांक २ या योजनेचे जनक खरे तर अप्पासाहेब निर्मळ. अप्पासाहेब निर्मळ यांनी वेळोवेळी आंदोलने व शासनदरबारी पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली होती.
योजना पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आ. वाघचौरे पावणेपाच वर्षांत पार पाडता आली नाही. कोणत्याही गावात गेले की आमदार संजय वाघचौरे हे आपण कोट्यवधीचा निधी आणून तालुक्याचा विकास केला असा डांगोरा पिटतात, मात्र हा निधी कोठे खर्च केला, असा सवाल विरोधक करीत आहेत. पण आ. वाघचौरे यांच्याकडे त्याचे सडेतोड उत्तर नाही. पैठणचे प्राधिकरणही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची देण आहे. आ. वाघचौरे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नयेत, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
बिडकीन परिसरातील डीएमआयसी हा प्रकल्प केंद्राचा आहे; परंतु वाघचौरे त्याचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालविला आहे.
वाघचौरे यांना आमदारकी मिळताच त्यांच्या स्वभावात मोठा बदल झाला. त्यांच्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले, अशा कार्यकर्त्यांना त्यांनी सर्वांत अगोदर बाजूला फेकले.
गाडीच्या काचा लावून प्रवास करणारे आमदार एक महिन्यापूर्वी जमिनीवर आले. आता त्यांना मतदार आठवू लागले आहेत. केवळ नातेवाईकांना सोबत ठेवून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे त्यांना संत एकनाथ साखर कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासारख्या निवडणुकीत कळलेच आहे. या निवडणुकीत त्यांना सपाटून मार खावा लागला. विधानसभा निवडणुकीत हाच अनुभव आल्यास आश्चर्य वाटू नये. स्वपक्षातून घेरण्याची तयारी सुरू झाली आहे.
औद्योगिक वसाहतीचा मुद्दाही गाजणार
आमदार संजय वाघचौरे यांनी गेल्या पावणेपाच वर्षांच्या काळात कोणतेही असे ठोस विकासाचे काम केलेले दिसून येत नाही; उलट पैठण- औरंगाबाद रस्ता, अनेक मोठ्या गावांतील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, अपुऱ्या आरोग्य सुविधा, ग्रामीण भागातील खराब रस्ते, बंद पडलेली ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना व अखेरची घटका मोजत असलेल्या पैठणच्या औद्योगिक वसाहतीला न मिळालेली चालना, हे मुद्दे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार संजय वाघचौरे यांना अडचणीचे ठरणार आहेत.

Web Title: Sanjay Waghchoure is a tough choice for the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.