संजय कच्छवे यांच्यावरील शहर प्रवेश बंदी उठविली
By Admin | Updated: September 6, 2014 00:29 IST2014-09-06T00:02:36+5:302014-09-06T00:29:18+5:30
पाथरी: नामदेवनगरच्या घटनेप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कच्छवे यांना पाथरी शहरात येण्यास घालण्यात आलेली बंदी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही अटींच्या अधारे उठविण्यात आली आहे.

संजय कच्छवे यांच्यावरील शहर प्रवेश बंदी उठविली
पाथरी: नामदेवनगरच्या घटनेप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कच्छवे यांना पाथरी शहरात येण्यास घालण्यात आलेली बंदी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही अटींच्या अधारे उठविण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कच्छवे यांना पाथरी शहरात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी शिवसेनेने आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनालाही स्थगिती देण्यात आली आहे.
पाथरी शहरातील नामदेवनगरच्या वादग्रस्त जागेवरुन १ सप्टेंबर रोजी शहरातील माळीवाडा परिसरात दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. याच घटनेच्या अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कच्छवे यांना गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन होईपर्यंत पाथरी शहरात येण्यास प्रशासनाने बंदी घातली होती. प्रशासनाच्या या भूमिकेच्या विरोधात आ.मीराताई रेंगे यांनी पत्र परिषद घेऊन कारवाईला स्थगिती द्यावी, यासाठी रास्ता रोको व गणेश विसर्जन होऊ देणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली होती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाच्या आवाहनावरुन उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी डॉ.कच्छवे यांच्यावर घातलेली पाथरी शहर बंदी काही अटींवर उठविली आहे. या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही व प्रक्षोभक भाषणावर निर्बंध घातले आहेत. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली.