संजना जाधव यांचा हर्षवर्धन जाधव गटाला दे धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:05 IST2021-02-09T04:05:46+5:302021-02-09T04:05:46+5:30
कन्नड : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पिशोर ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत माजी आ. हर्षवर्धन जाधव यांना दणका देत, ...

संजना जाधव यांचा हर्षवर्धन जाधव गटाला दे धक्का
कन्नड : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पिशोर ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत माजी आ. हर्षवर्धन जाधव यांना दणका देत, संजना जाधव यांनी केवळ दोन सदस्य असताना उपसरपंचपद आपल्या गटाकडे खेचून, आपण राजकारणात कमी नसल्याचे दाखवून दिले. त्यातच हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनेलचे ४ पैकी २ सदस्य फुटल्याने त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक झाल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या अर्धांगिनी संजना जाधव यांच्यातील कौटुंबिक कलह आता राजकीय कलहात रूपांतरित झालेला आहे. कन्नड पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदांच्या निवडणुकीपासून हा राजकीय कलह जास्तच वाढला. पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत संजना जाधवांनी आठ उमेदवार उभे केले, तर पुण्यातील मारहाण प्रकरणात हर्षवर्धन जेलमध्ये असताना, त्यांची धुरा खांद्यावर घेत त्यांचा मुलगा आदित्यवर्धन याने स्वतंत्र पॅनेल या निवडणुकीत उतरविले होते. आई विरुद्ध मुलगा हे जरी रिंगणात होते, तरीदेखील अन्य दोन पॅनेलही त्याच ताकदीचे उभे होते. त्यामुळे झालेल्या चौरंगी लढतीत पुंडलिकराव डहाके यांच्या पॅनेलचे ७, हर्षवर्धन जाधव यांचे ४, राजू मोकासे व नारायण जाधव यांचे ३, संजना जाधव यांचे २ व अपक्ष १ याप्रमाणे सदस्य निवडून आले. संजना जाधव यांनी ४ सदस्य असलेल्या हर्षवर्धन जाधव यांच्या गटाला दणका देत उपसरपंच पदावर आपल्या गटाच्या सदस्याची वर्णी लावली.
चौकट
संजना जाधव यांची सक्रिय राजकारणाची नांदी
कौटुंबिक कलहानंतर राजकारणात आपण कुठे कमी नसल्याचे सरपंच, उपसरपंच निवडीत संजना जाधव यांनी दाखवून दिले. दोन सदस्यांच्या जोरावर त्यांनी उपसरपंचपद आपल्या पॅनेलकडे खेचून घेतले. त्यातच हर्षवर्धन जाधवांच्या पॅनेलचे दाेन सदस्य फुटल्याने खळबळ उडाली. गावातील ग्रामपंचायतीमध्ये मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या संजना जाधवांची राजकारणात सक्रिय होण्याची ही नांदीच समजली जात आहे.