सांज भई बंदिशीने रंगली संगीत सभा
By Admin | Updated: August 10, 2014 02:02 IST2014-08-10T01:35:43+5:302014-08-10T02:02:44+5:30
औरंगाबाद : संगीत रसिकांनी राग पुरिया धनश्रीमधील विशाल कशाळकरांची बंदिश सांज भईची सुरम्य संध्याकाळ अनुभवली.

सांज भई बंदिशीने रंगली संगीत सभा
औरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त संगीत रसिकांनी राग पुरिया धनश्रीमधील विशाल कशाळकरांची बंदिश सांज भईची सुरम्य संध्याकाळ अनुभवली. शनिवारी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान गोविंदभाई श्रॉफ ललित अकादमीच्या संगीत सभागृहात द्वितीय संगीत सभा उत्साहात पार पडली.
या सभेत जयपूर- ग्वाल्हेर- किराणा घराण्याच्या गायिका व अभिजात संगीत या पुस्तकाच्या लेखिका अंजली मालकर यांनी गीते सादर केली. आपल्या गायनाची सुरुवात त्यांनी ‘पुरिया धनश्री’ रागातील ‘सांज भई ना आए पिहरवा’ या विलंबित तीन तालातील रचनेने केली. यानंतर त्यांनी ‘आ जरा दिन डुबा’ ही रचना सादर केली. यानंतर भूप रागमधील झपतालातील गुरूपद वंदन ही पं. कुमुदिनी काट्टारे यांची रचना सादर केली. अध्धातीन तालातील सुखनिधान श्रीराम या रचनेनंतर ‘गौड मल्हार’ रागातील पावसाळ्यातील प्रियकर आपल्या प्रेयसीला मनवण्याचा प्रयत्न करणारी ‘मानन करिए’ ही रचना त्यांनी उत्साहात सादर केली.
या सभेत पुढे तारिणी नववसन धारिणी हे नाट्यगीतही त्यांनी सादर केले. या संगीत सभेचा समारोप संत नामदेवांच्या राग भैरवीतील अंभगाने झाला. अंजली मालकर यांना संवादिनीवर गजानन केचे, तबला मंगेश कुलकर्णी, तानपुरा आश्विनी ठाणगे, धनश्री जोशी यांनी साथ संगत केली.
परिसरात शास्त्रीय संगीताचा प्रचार- प्रसार व्हावा या उद्देशाने मोठ्या उत्साहात सुरू केलेल्या या शताब्दी महोत्सवातील दुसऱ्या संगीत पुष्पाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष दिनकर बोरीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कोषाध्यक्ष रामकृष्ण जोशी, सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे व ज्ञानप्रकाश मोदाणी, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर रसाळ, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार आदींची उपस्थिती होती.
यावेळी सहभागी कलाकारांचा सत्कार संस्था सभासद प्रा. दिनकर कोरान्ने यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना रसाळ यांनी केले, तर उपप्राचार्य श्रीकांत मुळे यांनी आभार मानले. या संगीत सभेस गायिका पं. शुभदा पराडकर, प्रा. शिवराम गोसावी, डॉ. दिलीप घारे, श्रीकांत तांबे, हरिष देशमुख, कल्याण अपार, मंगला कुलकर्णी यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर रसिक श्रोत्यांनी हजेरी लावली.