राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारासाठी सांगवीची निवड
By Admin | Updated: April 14, 2017 01:07 IST2017-04-14T01:06:12+5:302017-04-14T01:07:04+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावाची सन २०१५-१७ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारासाठी निवड झाली

राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारासाठी सांगवीची निवड
तामलवाडी : पंचायत राज सशक्तीकरण व राष्ट्रीय गौरव ग्रामसभा अभियानांतर्गत मराठवाडा विभागातून तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) या गावाने बाजी मारली होती. आता या गावाची सन २०१५-१७ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारासाठी निवड झाली असून, २४ एप्रिल रोजी लखनऊ येथे केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागामार्फत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
औरंगाबाद विभागातून प्रथम विभागीय स्तरावर सांगवी (काटी) गावची निवड झाल्यानंतर ११ जानेवारी रोजी केंद्रीय पथकाकडून या गावाचे मूल्यांकन करण्यात आल होते. दोन सदस्यीय समितीने गावात ठिय्या मांडून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी झाली आहे का? पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला का? त्यामध्ये पारदर्शकता होती का? याची माहिती घेतली. पथकातील सदस्य उपेश कांबळे व गणेश सावंत यांनी गावातील ग्रामपंचायत अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा येथे समक्ष भेट देवून गावकऱ्यांशी ग्रामसभेतून संवाद साधला. विद्यार्थी, शिक्षक, बचत गटांच्या महिला यांच्या सहभागातून ग्रामसभांचे महत्त्व गावाला खऱ्या अर्थाने पटल्याचे यातून पुढे आले. या सर्व बाबीमुळेच पंचायत राज विभागाने मराठवाड्यातून एकमेव सांगवी (काटी) ग्रामपंचायतची निवड या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केली. पुरस्कार घोषित झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी गावकऱ्यांनी एकत्रित येवून आनंदोत्सव साजरा केला.