छावाने जाळले ‘सनफ्लॉवर’चे बॅनर

By Admin | Updated: July 16, 2016 01:14 IST2016-07-16T01:05:22+5:302016-07-16T01:14:37+5:30

लातूर : येथील तावरजा नदीवर रुंदीकरण आणि खोलीकरणावरुन सुरु झालेला वाद मिटायचे नाव घेत नाहीये. श्री. श्री. रविशंकर परिवाराच्या ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने हे काम केल्याचे सांगितले जाते.

'Sanflower' banner burned to the ground | छावाने जाळले ‘सनफ्लॉवर’चे बॅनर

छावाने जाळले ‘सनफ्लॉवर’चे बॅनर


लातूर : येथील तावरजा नदीवर रुंदीकरण आणि खोलीकरणावरुन सुरु झालेला वाद मिटायचे नाव घेत नाहीये. श्री. श्री. रविशंकर परिवाराच्या ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने हे काम केल्याचे सांगितले जाते. त्यात ‘सनफ्लॉवर वेल्फेअर फाऊंडेशन’नेही आम्हीच काम केल्याचा दावा करुन काही दिवसांपूर्वी तावरजाच्या पुलावर बॅनर लावले होते. शुक्रवारी छावाच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर जाळून आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांपासून तावरजा नदीच्या खोलीकरणाचे काम आम्हीच केले असा दावा ‘सनफ्लॉवर फाऊंडेशन’च्या संगीता लातूरकर यांनी केला होता. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सुरुवातीला हे काम श्री. श्री. रविशंकर परिवाराने केल्याचे सांगितले. यानंतर लातूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने नदी खोलीकरणासाठी परवानगी दिलेली पत्रेच पत्रकारांना दाखविली होती. यानंतर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी कामाच्या श्रेयावरुन वाद उत्पन्न केल्याचे कारण दाखवित त्यांच्याशी केलेला आपल्या कार्यालयाचा पत्रव्यवहार रद्द केला होता. मात्र त्यानंतर ‘सनफ्लॉवर फाऊंडेशन’च्या वतीने तावरजा नदीच्या पुलावर आपले बॅनर लावले होते. शुक्रवारी छावाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गणेश गोमचाळे यांच्या नेतृत्वाखाली सनफ्लॉवर फाऊंडेशनचे बॅनर जाळण्यात आले. त्यामुळे हा वाद आणखीन चिघळला आहे. यावेळी छावाचे बाळासाहेब सपाटे, दीपक नरवडे, बालाजी निकम, लखन बोराडे आदींची उपस्थिती होती़(प्रतिनिधी) सनफ्लॉवर फाऊंडेशनने २७ किलोमीटरचे काम १५० मजूर व १५ जेसीबीच्या सहाय्याने केल्याचा दावा करते. मग त्यातील वाळू, मुरुम, गाळ, माती हे गौण खनिज गेले कुठे ? याला टिप्परच वापरले नाहीत. मांजरा नदीचे १८ किमीचे काम खोलीकरणासाठी पाच महिन्याचा कालावधी लागतो, मग सनफ्लॉवरने २७ किमीचे काम एक महिन्यात कसे केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या संस्थेला दिलेल्या कामाच्या मान्यतेचाही खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.
तावरजावर आम्ही काम केले़ परंतु बॅनर जाळणाऱ्याशी आमचा संबंध नाही. आम्ही काम करतो. हिंसक कृत्य करीत नाही. २० किमीचे काम आर्ट आॅफ लिव्हिंगने २०१४-१५ या वर्षात केले़ पहिल्या वर्षी साडेबारा किमी तर दुसऱ्या वर्षी साडेसात किमीचे काम केले. हे लातूरकूरांना माहीत आहे. त्यामुळे कुणी केलेल्या दाव्याकडे आम्ही गांभीर्यानेही पहात नाही, असे महादेव गोमारे म्हणाले़
हे काम छावाच्या कार्यकर्त्यांचे नसून सुपारी देऊन केले गेले आहे. माझ्या कामाला प्रत्येक गावातील शेतकरी साक्षीदार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मी प्रत्यक्ष काम केले आहे. माझे बॅनर जाळले पण मी केलेले काम कसे जाळणार ? असा सवाल संगीता लातूरकर यांनी केला.छावाच्या कृत्याला मी कायद्याने उत्तर देणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: 'Sanflower' banner burned to the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.