रेतीची चोरटी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:15 IST2017-08-31T00:15:09+5:302017-08-31T00:15:09+5:30
तालुक्यातील सोळा अधिकृत रेती घाटांसह महसूल विभागाकडे नोंद नसलेल्या अनेक रेती घाटांतून महसूल विभागाची नजर चुकवून राजरोसपणे रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. पैनगंगा नदीपात्रातून रेतीचा उपसा करुन नदीकाठावर ढीग करुन शेकडो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.

रेतीची चोरटी वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : तालुक्यातील सोळा अधिकृत रेती घाटांसह महसूल विभागाकडे नोंद नसलेल्या अनेक रेती घाटांतून महसूल विभागाची नजर चुकवून राजरोसपणे रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. पैनगंगा नदीपात्रातून रेतीचा उपसा करुन नदीकाठावर ढीग करुन शेकडो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.
रेतीची अवैध वाहतूक रोखण्याचे अधिकार महसूल कर्मचाºयांना आहेत. मात्र संबंधितांकडून रेती तस्करांकडे कानाडोळा केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी लक्ष घालून रेतीच्या वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
शहर व परिसरात तसेच तालुक्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. या बांधकामांना रेतीची आवश्यकता असते.
रेती तस्कर रॉयल्टी न भरताच चोरुन आणलेली रेती गरजू बांधकाम करणाºयांना अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने तत्काळ रेती घाटाचा लिलाव करुन तत्पूर्वी पथके नेमून रेती तस्करीवर आळा घालण्याची आवश्यकताही व्यक्त होत आहे. पैनगंगा नदीसह तालुक्यातील छोट्या मोठ्या नाल्यांतून रेतीच्या अवैध उपशाकडे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार नरेंद्र देशमुख यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता उपशाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. रेतीचा बेसुमार उपसा राजरोसपणे सुरु असला तरी महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रेती तस्कर मालामाल होत आहेत.
रात्रंदिवस रेतीचा उपसा करुन ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूक होताना दिसत आहे. जून महिन्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव चौधरी यांनी रेतीचे ट्रॅक्टर जप्त केले होते.
जे काम महसूल विभागाच्या पथकाने करावयास हवे ते काम पोलिसांनी करुन महसूल विभागाला चपराक लगावली आहे. गोकुंद्यानजीक पाटबंधारे वसाहतीच्या पाठीमागे असलेल्या स्मशानभूमीलगत पैनगंगा नदीतून हा उपसा बिनदिक्कत सुरु आहे.