लोकेशनवर चालतो वाळूचा गोरखधंदा

By Admin | Updated: July 29, 2014 01:13 IST2014-07-29T00:50:19+5:302014-07-29T01:13:47+5:30

युवराज वाकडे, टाकळी अंबड पैठण तालुक्यातील गोदावरी नदीच्या टाकळी अंबड व गुळज या संयुक्त वाळूपट्ट्यातून वाळूचा बेसुमार उपसा होत असल्यामुळे गोदापात्राच्या पाणी पातळीत लक्षणीय घट होत आहे.

Sandy Gorakhandha runs on location | लोकेशनवर चालतो वाळूचा गोरखधंदा

लोकेशनवर चालतो वाळूचा गोरखधंदा

युवराज वाकडे, टाकळी अंबड
पैठण तालुक्यातील गोदावरी नदीच्या टाकळी अंबड व गुळज या संयुक्त वाळूपट्ट्यातून वाळूचा बेसुमार उपसा होत असल्यामुळे गोदापात्राच्या पाणी पातळीत लक्षणीय घट होत आहे. गोदापात्रात आमच्या वार्ताहराने फेरफटका मारल्यानंतर सर्वत्र वाळूचे ‘मायाजाल’ बघायला मिळाले. कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला प्रथमदर्शनी धडकी भरावी, असे हे ‘वाळूवर्ल्ड’ आहे. या गोरखधंद्यात ‘लोकेशन’ या शब्दाला विशेष महत्त्व आहे. यावरच माफियांचे वाळूराज सुरू असते.
या वाळूपट्ट्याचे ठेकेदार गायत्री इंटरप्राईजेसचे आशिष शर्मा यांनी जुन्या वाळूपट्ट्याला यावर्षी वाढीव मुदत मिळवून हा पट्टा चालू केला आहे. या गोदापात्रातील पट्ट्यामध्ये १४ बोटी सक्शन पंप व ११ पोकलँडद्वारे वाळू उपसा केला जात आहे. या वाळूपट्ट्यातून दिवसभरात जवळपास २०० ते २५० ट्रक वाळू उपसा केला जातो. आडूळ व पाचोड येथे वाळूच्या ट्रककडून अपघात घडल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाल्यामुळे आता जरी प्रत्येक ट्रक ३ ब्रास वाळू नेत असला तरी या अपघाताअगोदर २ ब्रासच्या रॉयल्टीवर जवळपास ५ पाच ब्रास वाळू एका ट्रकमध्ये नेली जात होती. या वाळूपट्ट्यात रात्री १० वाजेपासून ट्रकची गर्दी होऊन तेथे लाईन लावली जाते व सकाळी ५ वाजता वाळू भरण्यास सुरुवात होते. एक गाडी पोकलँडद्वारे भरण्यास अवघी ५ ते ७ मिनिटे लागतात. येथे हायवा भरण्यास सक्शन पंपधारकास १५०० रुपये, तर पोलकलँडला ६०० रुपये दिले जातात, तर रॉयल्टी ६००० रु. घेतली जाते. या संक्शन पंपावरील चालक हे उत्तर प्रदेश व बिहार येथून येथे काम करण्यास येतात. हे काम फक्त हेच लोक करीत असल्यामुळे या कामगारांना वाळूपट्ट्याच्या काळात विशेष मागणी असते. या आॅपरेटरना प्रति गाडी २०० रु. दिले जातात व त्यांचा संपूर्ण खर्च हा बोटमालकास करावा लागतो. वाळू ट्रक चालक एका दिवसात औरंगाबादच्या दोन खेपा करण्यासाठी सुसाट वेगाने चालवतात. शिवाय दुसऱ्या खेपेच्या वेळेस या ट्रकला रॉयल्टीमध्येही सूट मिळते, तर काही ट्रकचालक सकाळच्या रॉयल्टीवरच निभावतात. या ट्रक मालकामध्ये ट्रक औरंगाबादपर्यंत पोहोचेपर्यंत या ट्रकसोबतच दुसरे वाहन घेऊन हे ट्रकमालक रस्ता सुरक्षित आहे की नाही हे बघतात, या ट्रक मालकांमध्ये ‘लोकेशन’ हा शब्द कमालीचा प्रसिद्ध झाला आहे. रस्त्यावरील प्रशासन अथवा पोलिसांच्या कारवाईची काही क्षणातच सर्व ट्रकमालकांना माहिती मिळते. त्यामुळे प्रशासनही हतबल होते, तर प्रशासनातील काही कर्मचारीही या ट्रकचालकांंना बीफ्रिंग देतात, त्यामुळे प्रशासनही अडचणीत येत आहे.
गोदावरी नदीच्या काठावरच वाळूचा साठा
गोदापात्रापासून मेन रोडपर्यंतचा रस्ता माफियांनी मजबूत करून ठेवला आहे. जेणेकरून पावसाळ्यातही उपसा करता यावा, वाळू ठेकेदराकडून लोकप्रतिनिधी पुढारी व जे तक्रार करू शकतात, अशा सर्व लोकांशी हितसंबंध ठेवून त्यांना शांत केले जाते. या वाळू ठेकेदाराने गोदावरी नदीच्या काठावरच वाळूचा मोठा साठा करून ठेवला असून अडचणीच्या काळात या साठ्यातूनच वाळू भरून दिली जाते.

Web Title: Sandy Gorakhandha runs on location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.