वाळूचा बेदरकार ट्रक महिलेच्या अंगावर
By Admin | Updated: August 4, 2016 00:39 IST2016-08-04T00:34:32+5:302016-08-04T00:39:18+5:30
औरंगाबाद : जड वाहनांना शहरात प्रवेश बंद असताना वाळूमाफिया मात्र, शहरात रात्रंदिवस वाळूची वाहतूक करताना दिसतात. वाळूच्या ट्रकमुळे रोज लहान, मोठे प्राणांतिक अपघात घडत आहेत.

वाळूचा बेदरकार ट्रक महिलेच्या अंगावर
औरंगाबाद : जड वाहनांना शहरात प्रवेश बंद असताना वाळूमाफिया मात्र, शहरात रात्रंदिवस वाळूची वाहतूक करताना दिसतात. वाळूच्या ट्रकमुळे रोज लहान, मोठे प्राणांतिक अपघात घडत आहेत. गजानन महाराज मंदिराकडून पुंडलिकनगरकडे जाणाऱ्या भरधाव वाळूच्या हायवा ट्रकने बुधवारी सकाळी मोपेडस्वार माय-लेकांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात महिलेच्या दोन्ही पायांवरून ट्रकचे मागील चाक गेल्याने ती जायबंदी झाली तर तिच्या मुलाला किरकोळ मार लागला.
नेहा जोशी (४३) आणि समीर जोशी (१५, रा. अरुणोदय कॉलनी, बीड बायपास परिसर) अशी जखमींची नावे आहेत. बीड बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या नेहा आणि समीर जोशी हे माय-लेक बुधवारी सकाळी गजानन महाराज मंदिराकडून पुंडलिकनगरकडे मोपेडने (क्रमांक एमएच-२० सीबी ८१६१) जात होते. यावेळी नेहा दुचाकी चालवित होत्या तर समीर मागे बसला होता. पुंडलिकनगर रोडचे सध्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या रोडवरील पुंडलिक राऊत यांच्या पुतळ्यापासून पुढील रस्ता बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे तेथे त्यांनी आपली दुचाकी चढावरून पुढे घेतली. त्याच वेळी मागून भरधाव आलेल्या वाळूच्या हायवा ट्रकने (क्रमांक एमएच-२० डीई ९८८२) त्यांच्या दुचाकीला हुलकावणी दिली. त्यामुळे मोपेडस्वार नेहा या ट्रकच्या मागील चाकाखाली पडल्याने त्यांच्या दोन्ही पायावरून ट्रकचे चाक गेले. या अपघातात त्यांच्या दोन्ही पायाचा चुराडा झाला. तर समीरला किरकोळ मार लागला.
चालक पसार
हा अपघात घडताच शेजारील गॅरेज आणि वाहनचालकांनी आपली वाहने थांबवून मदतीसाठी धाव घेतली. यावेळी आपल्याला जमावाकडून चोप मिळेल, या भीतीपोटी चालक पळून जाऊ लागला. प्रत्यक्षदर्शी छगन चांदुरे आणि इतरांनी त्यास अडविले आणि नेहा यांच्या पायावरील ट्रकचे चाक काढण्यासाठी ट्रक मागे घ्यावयास लावला. उपस्थित लोक जखमींना मदत करण्यात मग्न असल्याचे दिसताच चालक आणि क्लीनर पळून गेले. या प्रकरणी संजय जोशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.
अॅम्ब्युलन्सला पाऊणतास उशीर...
अपघात घडताच प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ १०८ या शासकीय अॅम्ब्युलन्स सेवेशी संपर्क साधून अॅम्ब्युलन्स पाठविण्याचे कळविले. त्यानंतर दोन ते तीन वेळा या सेवेशी संपर्क साधला तेव्हा अॅम्ब्युलन्स रोशनगेट येथून येत आहे. तुम्ही प्रतीक्षा करा, असे सांगण्यात आले.
४अर्धा तास वाट पाहूनही अॅम्ब्युलन्स आली नाही आणि महिलेच्या असह्य वेदना पाहून नागरिकांनी रिक्षा थांबवून तात्काळ जखमी महिलेस उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठविले. यावेळी समीर आणि अन्य एक जणही त्यांच्यासोबत रुग्णालयात गेले. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे उशिराने अॅम्ब्युलन्स सायरन वाजवत घटनास्थळी दाखल झाली.
प्रत्यक्षदर्शींनी केली मदत...
अपघात घडताच प्रत्यक्षदर्शी छगन चांदुरे, दूध डेअरीचे मालक चंदनसिंग राजपूत, राम बताडे, सोनू अहिले आदी नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी महिलेच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाल्याने हे भीषण दृश्य पाहावत नव्हते. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात न्यावे, यासाठी चांदुरे यांनी अॅम्ब्युलन्सला फोन केला.
अॅम्ब्युलन्स येण्यास उशीर होत असल्याचे पाहून राजपूत यांनी प्रथम आपल्या दुकानातून दोन चादरी आणून अन्य लोकांच्या मदतीने नेहा यांना चादरीवर झोपवले आणि चादरीसह त्यांना उचलून रिक्षातून रुग्णालयात पाठविले.
वाहतुकीची कोंडी..
पुंडलिकनगर रोडचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने या रस्त्यावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. अपघातग्रस्त ट्रक घटनास्थळीच सुमारे तासभर उभा होता. शिवाय अपघात पाहणाऱ्या आणि मदतीसाठी थांबलेल्या लोकांनीही आपली वाहने थांबविल्याने तेथून जाणाऱ्या- येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला. परिणामी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक नाथा जाधव, चार्ली पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त ट्रक घटनास्थळावरून हटविला. त्यानंतर वाहतूक मोकळी झाली.
हप्तेगिरीच्या जोरावर अवैध वाळू वाहतूक
औरंगाबाद : पुंडलिकनगर रोडवर वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने केलेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील रस्त्यांवरून बेदरकारपणे धावणाऱ्या वाळू वाहतुकीच्या या गाड्या सातत्याने अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहेत. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही ती केवळ ‘हप्तेगिरी’मुळेच! हे वास्तव आहे. एरव्ही सर्वसामान्य दुचाकीस्वारांनी सिग्नल तोडला, नो पार्किंगमध्ये वाहन उभे केले किंवा हेल्मेट घातले नाही म्हणून गुन्हेगारांप्रमाणे अडवून कारवाई करणारे पोलीस अशा बेदरकार वाळूच्या वाहनांकडे साफ कानाडोळा करतात ते वाळूमाफियांकडून मिळणाऱ्या भरमसाठ ‘माये’पोटीच...
यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश वाळूपट्ट्यांचे लिलावच झाले नव्हते. त्यातच पावसाळ्यात तर वाळू उपशाला बंदीच असते. मात्र, महसूलच्या आशीर्वादाने हे वाळूमाफिया जिल्ह्यातील वाळूपट्ट्यांमधून राजरोसपणे वाळूचा बेकायदेशीर उपसा करीत आहेत आणि पोलिसांच्या आशीर्वादाने ती शहर व परिसरात बिनधास्त विक्री करीत आहेत.
वाळू चोरी आणि विक्रीशी तसे पाहिले तर सर्वसामान्यांना काही देणे-घेणेही नाही. मात्र, वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर, ट्रक, टॅक्टर या वाहनांचा ‘बेदरकारपणा’ ही सर्वसामान्यांसाठी खरी चिंतेची बाब आहे.
एक तर या वाहनांवर अल्पवयीन, अप्रशिक्षित चालक दिसून येतात. त्यातील अनेक जण तर नशा करून वाहन चालवीत असल्याचे अनेकदा उघडकीस आलेले आहे. त्यातच वाळूचा उपसा आणि वाहतूक हा ‘चोरीचा मामला’ असल्याने हे वाहनचालक शक्य तितक्या लवकर नियोजित जागी पोहोचण्यासाठी अक्षरश: बेदरकारपणे वाहने चालवितात.
त्यावेळी ते आपण हायवेला वाहन चालवीत आहोत की शहरातील मुख्य रस्त्यावर, गल्लीबोळात याचेही भान ठेवत नाहीत आणि त्यातूनच अपघात घडत आहेत.
अनेक वाहने पोलिसांचीच
धक्कादायक बाब म्हणजे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये खुद्द पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच काही वाहने असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘खाकी’तील हे वाळूमाफिया वर्दीचा वापर करून मार्गावरील आपल्या सहकाऱ्यांना व्यवस्थित मॅनेज करतात. बुधवारी पुंडलिकनगर रोडवर ज्या हायवाने अपघात घडला त्या हायवाचा पडद्याआडचा सूत्रधार पोलीस कर्मचारीच असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे तो पोलिसवाला मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीतच कार्यरत आहे.
ठाण्याला दरमहा १५ ते २५ हजारांचा हप्ता
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरासह ग्रामीण भागातील ज्या- ज्या ठाण्यांच्या हद्दीतून वाळू वाहतूक होते, त्या प्रत्येक पोलीस ठाण्याला केवळ एका ट्रकचा दरमहा १५ ते २५ हजार रुपयांचा हप्ता मिळतो. एकदा का हप्ता दिला की, त्या ट्रकच्या महिनाभरात कितीही ट्रिप झाल्या तरी ‘त्या’ ठाण्यातील कोणताही पोलीस ते वाहन अडवीत नाही. विशेष म्हणजे प्रत्येक ठाण्याने हा हप्ता वसुलीसाठी खास कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. तो कर्मचारीच वाळू वाहतुकीच्या वाहनांचे हप्ते गोळा करतो, त्याचा हिशोब ठेवतो.
दरमहा लाखोंची वरकमाई
विशेष म्हणजे औरंगाबादेत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या शेकडोच्या घरात आहे. त्यामुळे यातून पोलिसांना दरमहा मोठा वरकमाईचा ‘महसूल’ मिळत आहे. एकीकडे पोलीस चौकाचौकांत उभे राहून सर्वसामान्य नागरिकांना कायदा शिकवताना दिसून येतात. हेल्मेट नाही, लायसन्स नाही, वाहनाची कागदपत्रे नाही म्हणून एखाद्या अट्टल गुन्हेगाराप्रमाणे अडवून कारवाई करताना दिसतात. नो पार्किंगमध्ये दुचाकी उभी केल्याचे सांगून वाहने उचलून नेऊन सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करतात. सर्वसामान्यांना शिस्त, कायदा शिकविणारे याच पोलिसांच्या डोळ्यादेखत चोरीची वाळू घेऊन बेदरकारपणे जाणाऱ्या ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टरला मात्र ‘माये’पोटी कधीच पोलीस अडविताना दिसत नाहीत, हे वास्तव आहे. अशा या हप्तेगिरीमुळेच शहर परिसरात अवैध वाळू वाहतूकदारांचा बेदरकारपणा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातूनच अपघात घडत आहेत, सर्वसामान्य नागरिकांचे बळी जात आहेत.
कंत्राटदाराच्या चुकीमुळे अपघात
औरंगाबाद : पुंडलिकनगर येथील व्हाईट टॅपिंगच्या रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. जेवढ्या रस्त्याचे काम झाले, तेथून पुढील रस्ता वाहतुकीला खुला करण्याची मागणी असतानाही तो खुला होत नाही. त्यामुळे स्व.पुंडलिक राऊत चौकात बुधवारी भयावह अपघात घडला आहे. या सगळ्या प्रकाराला कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक गजानन मनगटे यांनी केला.
भुयारी गटार योजनेच्या कंत्राटदाराने रस्ते मधोमध खोदून ठेवल्यामुळे गजानन मंदिर, सेव्हन हिल ते सूतगिरणीपर्यंतच्या रस्त्यांचे काम रखडले आहे. पालिकेने याप्रकरणी तातडीने तोडगा काढून तो रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी रामदास गायके, बापू कवळे, राम बताडे यांनी केली आहे.
तसेच हनुमान चौक आणि पटियाला बँकेजवळ वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सूर्यकांत जायभाये यांनी वाहतूक शाखेकडे केली आहे. त्या रस्त्यावर सार्वजनिक आणि नागरी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तातडीने प्रत्येक चौकात स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सकाळी ९ ते ११, दुपारी १ ते ५ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत गजानन मंदिर ते जयभवानीनगर या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी असते, असेही जायभाये यांनी सांगितले.
अपघात झाल्यानंतर आली जाग...
त्या रस्त्यावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाल्यानंतर सर्वांना जाग आली. तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी कंत्राटदाराने आणखी तीन दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु वाहतुकीचा रेटा आणि वाढत्या अपघातामुळे रस्ता गुरुवारपासून खुला होण्याची शक्यता आहे. असे असले तरी रस्त्याचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर पुन्हा तो रस्ता अपघातासाठी आमंत्रण देण्याची शक्यता आहे.
कंत्राटदाराविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी
औरंगाबाद : बुधवारी सकाळी पुंडलिकनगर रोडवर झालेल्या अपघाताला रस्त्याचे काम संथगतीने करणारा ठेकेदारच जबाबदार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावर सध्या व्हाईट टॅपिंगचे काम सुरू आहे. वर्षभरापासून सुरू असलेले हे काम अत्यंत संथगतीने होत आहे. त्यामुळे हा रस्ता एकतर्फी सुरू आहे. या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी आणि लहान-मोठे अपघात घडत असतात. बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताला हा ठेकेदारच जबाबदार आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप कार्यकर्ते राम बताडे यांनी पुंडलिकनगरच्या निरीक्षकांकडे केली आहे.
हप्त्याची ‘दहीहंडी’ भरताच वाहतुकीस मुभा
वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवाचालकांना महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचे खिसे गरम करावे लागतात. हप्त्याची ‘दहीहंडी’ भरल्यानंतरच या वाहनांना वाळूची वाहतूक करण्याची मुभा दिली जाते.
गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ‘हायवा’मुळे महिलेचे पाय निकामी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वाळूच्या अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
औरंगाबाद तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी हायवाचालकांकडून हप्ता वसूल करण्यासाठी चिकलठाण्यात ‘दहीहंडी’ बसविली आहे. हप्त्याने ही ‘दहीहंडी’ भरताच अवैध वाहतुकीचा परवानाच हायवाचालकांना मिळतो. हप्त्याची ‘दहीहंडी’ची तहसील कार्यालयात ‘आवक’ होताच ती रिकामी करून घेतली जाते.
कमरेच्या त्रासाचे कारण दाखवून गेल्या दहा वर्षांपासून ‘आवक जावक’ विभागात ठाण मांडून बसलेला एक कर्मचारी तसेच एक शिपाई यांनी या कामात निपुणता मिळविली असल्याचे बोलले जाते.
वाळूची वाहतूक करणाऱ्या सर्व ‘हायवा’ चालकांना हप्त्याची ‘दहीहंडी’ भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. एखादा ट्रक ‘दहीहंडी’ न फोडताच जात असल्यास व्यवसायातील इतर भागीदार असणाऱ्या इतर ट्रकचालकांकडून या टीपची तातडीने ‘आवक’ केली जाते.
वरील जोडगोळी थेट सरकारी गाडी घेऊन हायवाचा पाठलाग करण्यास निघतात, असे माहीतगार सूत्रांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी हप्त्याच्या वादातून तहसील कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनावर ‘हायवा’ ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला होता, हे विशेष.