पाऊस लांबल्याने वाळू चोरटे मोकळे

By Admin | Updated: July 10, 2014 00:44 IST2014-07-10T00:17:58+5:302014-07-10T00:44:11+5:30

राजेश गंगमवार, बिलोली पावसाळा लांबला, बाभळीचे दरवाजे उघडले़ परिणामी आता गोदावरी पात्रातील वाळू देखील मांजराप्रमाणेच लंपास केली जात आहे़

The sand steals open after rain lasts | पाऊस लांबल्याने वाळू चोरटे मोकळे

पाऊस लांबल्याने वाळू चोरटे मोकळे

राजेश गंगमवार, बिलोली
पावसाळा लांबला, बाभळीचे दरवाजे उघडले़ परिणामी आता गोदावरी पात्रातील वाळू देखील मांजराप्रमाणेच लंपास केली जात आहे़ दोन्ही नदीपात्र जवळपास ४० गावांशी संबंधित असून वाळू चोरट्यांना कंट्रोल करणे महसूल विभागाला अवघड होवून बसले आहे़
जुलैचा दुसरा आठवडा आला तरी पावसाचा पत्ता नाही़ दुसरीकडे बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडल्यामुळे साठा झालेले पाणी तेलंगणात वाहून गेले़ मांजरा नदी प्रमाणेच गोदावरीचे पात्र देखील कोरडेठाक झाले आहे़ मागच्या सहा महिन्यात गोदावरी पात्रात जलसाठा असल्याने वाळूउपसा करणे अवघड होते़ पण आता नदी कोरडी झाल्याने बेधडक उपसा होत आहे़ चिरली-टाकळी, राहेर आदी पात्रातून वाळू वाहतूक केली जात आहे़ पैसा कमावण्याचा हा गोरखधंदा मध्यरात्रीपासून सुरू करून पहाटे पाच वाजेपर्यंत केला जात असल्याचे पुढे आले़ दिवसभरात पोलिस व महसूल विभाग फिरतच असतात़ त्यामुळे दिवसा शुकशुकाट व रात्री झगमगाट अशी स्थिती वाळूसाठी दिसत आहे़ सर्वच खाजगी व शासकीय क्षेत्रात बांधकाम जोरात असल्याने वाळूची प्रचंड मागणी आहे़ त्यामुळे वाट्टेल तो भाव देवून वाळू खरेदी केली जात आहे़
गोदावरीची स्थिती पाणी सोडल्याने झाली तर मांजरा नदीत पाणीच नसल्यामुळे पात्र कोरडे राहिले़ मांजराच्या वाळूला दोन्ही राज्यात मागणी आहे़ परिणामी वाळू चोरट्यांची चढाओढ लागली आहे़ बिलोली तालुक्यातील दोन कि़ मी़ सीमा भागात येवून तेलंगणावासी वाळूची वाहतूक करीत आहेत़
मुदतीपूर्वीच वाळूघाट बंद
यावर्षी शासकीय वाळू घाटातील वाळू उपसा करण्याची मुदत ३०सप्टेंबर १४ पर्यंत होती़ शासनाने ई-लिलाव करून वाळूघाट संबधित ठेकेदारांच्या ताब्यात दिले़ महिनाभर उपसा होताच अवैध व जास्तीचा वाळू उपसा झाल्याचा ठपका झाला़ जिल्हा प्रशासनाने अहवाल मागवला आणि दंडात्मक कार्यवाही केली व वाळूघाट व वाळूघाट बंद केले़
योगायोगाने यावर्षी पावसाळा लांबल्याने वाळू उपशाची संधी होती़ पण कार्यवाहीमुळे ठेकेदारांचे स्वप्न भाग झाले़ दरवर्षी ३१ जुलै अखेरची मुदत असते़ पण ई-लिलाव प्रक्रिया उशिरा झाल्याने मुदत वाढवण्यात आली़ गेल्या महिन्यात गंजगाव वाळू घाटाची तपासणी करून तो देखील बंद करण्यात आला़ सद्यस्थितीत एकाही वाळूघाटाला परवानगी नाही़ त्यामुळे वाळूचोरट्यांना रान मोकळे झाले़
फुकटच्या वाळूला सोन्याचा भाव
अथांग पसरलेल्या गोदावरी व मांजरा नदी पात्रात प्रचंड वाळूसाठा आहे़ पाणीच नसल्याने केवळ वाळूच दिसत आहे़ जिकडे जा तिकडे वाळू असे चित्र झाले आहे़ वाळूची मागणी तर प्रचंड आहे़ फुकटची वाळू सोन्याच्या भावात विकत आहे, अशा स्थिती कोण चूप बसेल, असे गाव परिसरातील नागरिक सांगत आहेत़ गोदावरीची काळसर व मांजरातील लाल वाळूचे दर वेगवेगळे आहेत़ जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा व कर्नाटकात वाळूची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाळूची बेधडक वाहतूक होत आहे़
फ्लार्इंग स्कॉडची गरज
दोन्ही नदीपात्र परिसरात दोन पोलिस ठाणे येतात़ तर बिलोली, धर्माबाद व उमरी महसूलचा संबंध येतो़ त्यामुळे प्रत्यक्षात कोण कार्यवाही करावी असा प्रश्न निर्माण होतो़
जिल्हाधिकारी व गौणखनिज विभाग केवळ बघ्याची व कधीतरी थातूर-मातूर कार्यवाही करून मोकळे होतात़ पुन्हा वाळूची बेधडक वाहतूक होते़ अशा परिस्थितीत तस्करी रोखण्यासाठी अन्य तालुक्यातील पोलिस व महसूल आणि गौण खनिज कर्मचाऱ्यांचे संयुक्त फिरते पथक (दिवसरात्र) निर्माण करता येते़ तालुक्यातीलच पथक राहिलयास ओळखीने कार्यवाही होत नाही़ फ्लार्इंग स्कॉड झाल्यास वाळूवर पूर्णत: कंट्रोल येईल असे जाणकारांचे मत आहे़ त्याचप्रमाणे निवडणुकीत जसे चेकपोस्ट होते तसे सीमावर्ती भागात वाळू तपासणी नाके देखील वाळू चोरट्यांवर नियंत्रण करू शकतील़
दोनशे ट्रॅक्टरधारक सक्रीय
दोन्ही नदीपात्रात वाळूसाठी ट्रक जावू शकत नाही, अशा स्थितीत ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे़ सध्या पाऊस नसल्याने शेतीमध्ये ट्रॅक्टरला कामे नाहीत, त्यात वाळूची मागणी खेड्यापाड्यात व शहरात देखील आहे़ त्यामुळे ट्रॅक्टरधारक वाळूच्या अवैध व्यवसायाकडे वळले आहे़ दिवसभर घरासमोर व शेतामध्ये थांबलेले ट्रॅक्टर मात्र रात्रीच्या वेळी वाळूसाठी सक्रीय होत आहेत़ ट्रॅक्टरमधून केलेली वाळू वाहतूक ट्रकमधून लंपास केली जात आहे़

Web Title: The sand steals open after rain lasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.