वाळू तस्करीत पोलीस, आरटीओचे साटेलोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 00:05 IST2016-01-11T23:57:55+5:302016-01-12T00:05:47+5:30
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार वाळूची तस्करी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आरटीओंनी पोलिसांना सोबत घेतले;

वाळू तस्करीत पोलीस, आरटीओचे साटेलोटे
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार वाळूची तस्करी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आरटीओंनी पोलिसांना सोबत घेतले; परंतु त्यांच्यातच साटेलोटे असल्यामुळे एक ट्रक पळाल्याची माहिती उघडकीस आली आहे. वाळूची तस्करी रोखण्यात प्रशासनातील यंत्रणा टोलवाटोलवी करीत असल्यामुळे चोरटी वाहतूक फोफावली आहे.
दोन दिवसांत १० ब्रास वाळू घेऊन जाणारा एक ट्रक महसूल पथकाच्या हाती लागला; परंतु आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेली ढील आणि पोलिसांनी तक्रार नोंदविण्यात दाखविलेल्या असमर्थतेमुळे ट्रकमालकाने आपल्या टोळीसह धूम ठोकली.
उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्याकडे रविवारी रात्री घडलेल्या या प्रकाराचा पूर्ण लेखी मसुदा सोमवारी आला असून, घडलेला सर्व प्रकार भयावह आणि थक्क करणारा आहे.
तहसीलदार मुुंडलोड यांनी सांगितले, रविवारी रात्री एमएच-१२ आर-९४७९ हा १० ब्रास घेऊन जाणारा वाळूचा ट्रक नगरनाका येथे पकडला. ट्रकमध्ये खाली वाळू आणि वर लाकडांचा थर होता. मंडळ अधिकाऱ्यांना पथकाला ट्रक पकडल्याची माहिती दिली. पथकाने नगरनाक्यावर ट्रक अडविला. आरटीओचे वाहन निरीक्षक नागरे तेथे होते. महसूलच्या पथकाने नागरे यांना ट्रक पोलीस अथवा तहसीलमध्ये जमा करण्यास सांगितले. परंतु नागरे यांनी ट्रक दंडात्मक कारवाई करण्यासाठी वजन काट्याकडे नेण्याचे सांगितले, त्या ट्रकमध्ये मंडळ अधिकारी, कोतवाल बसले. त्याच वेळी ट्रकमालक सिद्दीकी पहेलवान व त्यांचे १२ साथीदार नगरनाका परिसरात आले. त्यांनी मंडळ अधिकारी, कोतवालला खाली उतरवून ट्रक पळवून नेला. नागरेदेखील तेथून निघून गेले.
छावणी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी मुद्देमाल आणला तर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगून महसूलच्या पथकाला ठाण्यातून पिटाळले. या प्रकरणाची जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल.