वाळू माफियांची मंडळ अधिकाऱ्यास मारहाण
By Admin | Updated: December 3, 2015 00:31 IST2015-12-03T00:11:44+5:302015-12-03T00:31:12+5:30
जालना : अवैध वाळूसाठ्यावर कारवाई करताना वाळू माफियांनी मंडळ अधिकाऱ्यास मारहाण करून पंचनामा केलेले कागदपत्रे फाडली. त्यानंतर पसार झाल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.

वाळू माफियांची मंडळ अधिकाऱ्यास मारहाण
जालना : अवैध वाळूसाठ्यावर कारवाई करताना वाळू माफियांनी मंडळ अधिकाऱ्यास मारहाण करून पंचनामा केलेले कागदपत्रे फाडली. त्यानंतर पसार झाल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.
मंठा तालुक्यातील टाकळखोपा गावाच्या उत्तर दिशेला वाळूचा अवैधरित्या साठा असल्याची माहिती मिळाल्याने मंठा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार उत्तम बहुरे, मंडळ अधिकारी अनिल पुरी व महसूलचे अन्य कर्मचारी बुधवारी सकाळी टाकळखोपा गावात गेले होते. तेथे अवैध वाळूचा साठा जप्त करून पंचनामा करीत असताना त्या ठिकाणी विनोद लाड, सुखदेव लाड व विष्णू लाड हे आले. त्यांनी मंडळ अधिकारी पुरी यांना शिवीगाळ करून चापटा, बुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील पंचनाम्याचे कागदपत्रे फाडून ते सोबत घेवून गेले.
या घटनेने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी नायब तहसीलदार बहुरे यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलिस ठाण्यात विनोद लाडसह तीन जणांविरूद्ध शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सी.एम.चरभरे हे करीत असल्याची माहिती ठाणेअमंलदार डी. आर. इंगळे यांनी दिली. (प्रतिनिधी)