वाळू माफियांना प्रशासनाचे अभय
By Admin | Updated: November 16, 2015 00:40 IST2015-11-15T23:35:19+5:302015-11-16T00:40:12+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड वाळूपट्टा असलेल्या गेवराई, माजलगाव या तालुक्यांमध्ये बेसुमार वाळू उपसा होत आहे. शासनाने वाळू लिलावच केलेला नसतानाही चोरट्या मार्गाने वाळू नेली जात आहे.

वाळू माफियांना प्रशासनाचे अभय
व्यंकटेश वैष्णव , बीड
वाळूपट्टा असलेल्या गेवराई, माजलगाव या तालुक्यांमध्ये बेसुमार वाळू उपसा होत आहे. शासनाने वाळू लिलावच केलेला नसतानाही चोरट्या मार्गाने वाळू नेली जात आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वाळू माफियांना प्रशासनाचेच अभय मिळत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात एकूण १२ ठिकाणी वाळू पट्टे आहेत. पर्यावरणाला होत असलेला धोका लक्षात घेवून शासनाने वाळूचे ठेके पूर्णत: रद्द केलेले आहेत. प्रशासनाच्या ‘रेकॉर्ड’नुसार एकाही ठिकाणावरून वाळू उपसा होत नाही. मात्र, प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर ट्रकांद्वारे रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे. यांची संबंधित तहसिलदारांना कल्पना आहे. याबाबत अनेक तक्रारी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या आहेत. असे असताना देखील प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
गेवराईत एक महिन्यात केवळ
तीन वाहनांवर कारवाई
एकट्या गेवराई तालुक्यात ८०० ते ९०० ट्रक, ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक केली जाते. केवळ रात्रीच वाळू चोरी होते असे नाही तर दिवसा देखील वाळू अवैधरित्या उचलली जाते. असे असताना मागील एक महिन्यात केवळ तीन वाहनांवर गेवराई प्रशासनाने कारवाई केली असल्याचे प्रभारी तहसिलदार वैजीनाथ जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
माजलगावात कारवाईकडे पाठ
केवळ माजलगाव तालुक्यातून १५० च्या जवळपास ट्रक व ट्रॅक्टर वाळू उपसा करतात. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूच्या ट्रक सूरू आहेत. या संदर्भात कारवाई केवळ ४ वाळू ट्रकवर केली आहे. दीडशेच्या वर ट्रक असताना केवळ चारच गाड्यांवर कारवाई झाली आहे.
वाळू उपसा बंद करा
यंत्राद्वारे वाळू उपसा केला जात आहे. एवढेच नाही तर माजलगाव व गेवराई तालुक्यात शेकडो ट्रक वाळूचा साठा केला जात आहे. असे असताना देखील कारवाई होत नाही. वाळू माफियांवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनविसेचे बाळासाहेब डुकरे यांनी दिला आहे.
ठेकेदार मोकाट, ट्रकवाल्यांवर बडगा
अवैध वाळू उपशावर कारवाईचा देखावा करीत प्रशासनाकडून केवळ ट्रकचालकांना वेठीस धरले जाते. ठेकेदारांवर मात्र कारवाई होत नाही. त्यामुळे ठेकेदारांना पाठीशी घालून ट्रकवाल्यांवरच अवैध वाळू वाहतूक केल्याचा ठपका ठेवला जातो. ट्रक चालकांना पोलीस, आरटीओ, महसूल प्रशासन अशा सर्वांना तोंड द्यावे लागते.
गोदावरी नदीपात्राभोवतीच मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा केला जात आहे. हा प्रकार प्रशासनातील अधिकारी उघड्या डोळ्याने पहातात. मात्र, आतापर्यंत एकाही साठेबाजांवर जिल्हा प्रशासनाने अथवा संबंधित तहसिलदाराने कारवाई केलेली नाही. यामुळे साठेबाज मोकाट सुटत आहेत.
यंत्राद्वारे नदीपात्रातील वाळू उपसा केला जात आहे. यामुळे नदी पात्रातील पाणीपातळी देखील मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. अगोदरच जिल्हयात दुष्काळी परिस्थिती आहे. यातच वाळू उपशामुळे गेवराई, माजलगावच्या वाळूपट्टयातील पातळी खालावत चालली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.