शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ
By Admin | Updated: April 22, 2015 00:39 IST2015-04-22T00:36:28+5:302015-04-22T00:39:19+5:30
कळंब : मागील चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या काही शेतकऱ्यांना मागील रबी हंगामाच्या संरक्षित पिकांच्या विम्यापोटी दोन,

शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ
कळंब : मागील चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या काही शेतकऱ्यांना मागील रबी हंगामाच्या संरक्षित पिकांच्या विम्यापोटी दोन, तीन रूपये दिले आहेत़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बहुला (ताक़ळंब) येथील शेतकऱ्यांनी अनुदानापोटी आलेली रक्कम डीडीद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस परत करण्याचा निर्णय घेतला आहे़
मागील चार-पाच वर्षांपासून अवेळी पडणारा पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांचे नुकसान सोसावे लागत असून, पदरी निराशाच पडत आहे़ त्यामुळे शासनाच्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत सन २०१३-१४ मध्ये रबी हंगामात बहुला येथील शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचा हप्ता भरून संरक्षित करून घेतली होती़ मात्र, अॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनी आॅफ इंडियाने या कंपनीने केवळ ज्वारी या पिकास नुकसानभरपाई जाहीर केली आहे़ शेतकऱ्यांची अनुदान रक्कम जिल्हा बँकेच्या विविध शाखांना पाठविण्यात आले असून, याबाबतचे पत्र इटकूर शाखेतही आले आहे़ विमा रक्कम आल्याची माहिती मिळाल्यानंतर बहुला येथील शेतकरी विमा उचलण्यासाठी बँकेत आले़ मात्र, नुकसानभरपाईची रक्कम पाहता अनेकांनी संताप व्यक्त केला़ यामध्ये किमान १ रूपये ३१ पैसे तर कमाल ६ रूपये ६३ पैसे अशी भरपाई आल्याचे दाखविण्यात आले आहे़ ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रियाही सुरू होती़ तर संतापलेले शेतकरी अनुदान नको, अशी संतप्त प्रतिक्रिया देत होते़ इटकूर शाखेत बहुला येथील आत्माराम लक्ष्मण बिक्कड यांना २ रूपये ८२ पैसे, हशमोद्दीन शमशोद्दीन शेख यांना १ रूपया ३१ पैसे, बलभीम नामदेव शेळके यांना ३ रूपये ७५ पैसे, अर्जुन नामदेव शेळके यांना २ रूपये ८२ पैसे तर पाथर्डी येथील कोंडीबा मुरलीधर बसाळगे यांना ५ रूपये ६३ पैसे, अंगद मुरलीधर बसाळगे यांना ५ रूपये ६३ पैसे, आढाळा येथील अरूण भगवान हारे यांना १ हेक्टर ३७ आर एवढ्या क्षेत्रासाठी १८ हजार ३५६ रूपये एवढ्या विमा संरक्षित रक्कमेपोटी केवळ ३४९ रूपयांचा हप्ता भरला होता़ यापोटी वरील सात शेतकऱ्यांना २५ रूपये ७१ पैसे एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ ही रक्कम पाहता शेतकऱ्यांनी शासनाच्या व कंपनीच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करीत मोठा संताप व्यक्त केला़ (वार्ताहर)