जिल्ह्यात सलाईन, औषधींचा तुटवडा !
By Admin | Updated: July 23, 2016 00:56 IST2016-07-23T00:46:34+5:302016-07-23T00:56:02+5:30
उस्मानाबाद : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. असे असतानाच जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलाईनसह

जिल्ह्यात सलाईन, औषधींचा तुटवडा !
उस्मानाबाद : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. असे असतानाच जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलाईनसह आयव्ही सेट आणि जुलाबावरील (लहान मुलांसाठीचे) औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या औषध भंडारात सलाईनच्या अवघ्या ६१ बॉटल शिल्लक आहेत. जुलाबावरील औषधाचा तर पत्ताच नाही. त्यामुळे दुर्दैवाने साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर औषधे आणायची कोठून? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर किमान प्रथमोपचार तरी मिळावेत, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा जन्म झाला. जिल्हाभरात अशा केंद्रांची संख्या ही ४२ एवढी आहे. सदरील आरोग्य केंद्राअंतर्गतच उपकेंद्रही चालविली जातात. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्याही जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. जिल्हाभरातील तब्बल सात ते आठ आरोग्य केंद्रांना सध्या डॉक्टर नाहीत. जे डॉक्टर उपलब्ध आहेत, त्यांच्याकडे दोन ते तीन केंद्राचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे एखादा रूग्ण आरोग्य केंद्रात गेल्यानंतर तेथे डॉक्टर उपलब्ध असतीलच, याची शाश्वती देता येत नाही. परिणामी याचा फटका रूग्णांना सोसावा लागत आहे. दरम्यान, हे थोडके म्हणून की, काय सध्या आरोग्य केंद्रांना औषधांच्या तुटवड्यालाही तोंड द्यावे लागत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जुलाब, उलट्या, थंडी-ताप, खोकला आदी साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळेच आरोग्य केंद्रासोबतच खाजगी दवाखान्यांतही रूग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. असे असतानाच आरोग्य केंद्रात वेगवेगळ्या औषधांसोबतच सलाईनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या औषध भंडारात सध्या केवळ सलाईनच्या ६१ बाटल्या शिल्लक आहेत. आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना एक बाटली द्यायचे म्हटले तरी हे सलाईन कमी पडतात. आरोग्य केंद्रस्तरावर ३ हजार १०२ सलाईन आहेत, असा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक केंद्रामध्ये सलाईनच उपलब्ध नाहीत. त्यामुळे रूग्णांना खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागत आहे. त्याचप्रमाणे सलाईन लावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘आयव्ही सेट’ही उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठीची जुलाबावरील औषधेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे उपरोक्त चित्र पाहता जिल्हाभरातील आरोग्यसेवाच सलाईनवर असल्याचे प्रकर्षाने जानवते. (प्रतिनिधी)
जिल्हा रूग्णालयमध्ये औषधींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर त्यांना स्थानिकस्तरावर ठराविक मर्यादेत खरेदी करण्याचे अधिकार आहेत. परंतु, जिल्हा परिषदेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना औषधी खरेदीचे अधिकार नाहीत. त्यामुळे कुठल्याही औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर प्रशासनाला उसणवारी करून गरज भागवावी लागत आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ठराविक मर्यादेत औषधी खरेदीचे अधिकार द्यावेत, अशी गरज काही अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली.