बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री

By Admin | Updated: August 1, 2016 00:08 IST2016-08-01T00:02:03+5:302016-08-01T00:08:37+5:30

औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे एका महिलेस बागशेरजंग परिसरातील दाऊदपुरा येथील भूखंडाची विक्री करून गंडा घातला.

Sale of plot on the basis of counterfeit documents | बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री

औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे एका महिलेस बागशेरजंग परिसरातील दाऊदपुरा येथील भूखंडाची विक्री करून गंडा घातला. याप्रकरणी एक जणाविरोधात क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदू नायडू असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, सुमन तुकाराम सुरडकर यांच्या पतीशी आरोपीची ओळख होती. २००४ मध्ये एक दिवस चंदू हा सुरडकर यांच्या घरी गेला. त्याने हैदराबादेतील अकबर नवाब यांचे आपण जीपीएधारक असल्याचे त्याने सांगितले. अकबर नवाब यांच्या बागशेरजंग, दाऊदपुरा येथील शहर भूमापन क्रमांक १४८१४/ए२/२ रमानगर परिसरातील जमिनीवर प्लॉटिंग पाडण्यात आलेली आहे. तेथील मोजकेच भूखंड शिल्लक राहिलेले आहेत. या भूखंडापैकी वीस बाय तीस क्षेत्रफळाचे दोन भूखंड त्याने सुमन यांना १ लाख २० हजार रुपयांत विक्री केले.
याबाबतचा नोटरी करारनामा त्याने २५ आॅगस्ट २००४ रोजी करून दिला. काही दिवसांनंतर सुमन या पतीसह भूखंडावर गेल्या असता तेथे जोगदंड नावाच्या व्यक्तीचे घर असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही बाब नायडू यास सांगितली आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केली असता त्याने तुम्हाला ६० बाय ६० चौरस मीटरचा भूखंड देतो, असे सांगितले.
या मोठ्या भूखंडासाठी त्याने बयाणा म्हणून सुमन यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर मात्र त्याने भूखंड दिला नाही. त्यामुळे त्यांनी पैशासाठी तगादा लावला असता त्याने चार धनादेश दिले. यापैकी केवळ २० हजार रुपयांचा एक धनादेश वटला. उर्वरित धनादेश न वटता परत आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा याविषयी जाब विचारला. मात्र तो सतत उडवाउडवीची उत्तरे देत होता. दरम्यान, सुमन यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. आयुक्तांनी प्रकरण चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविले. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला.
भूखंडाची परस्पर विक्री; २१ लाखांची फसवणूक
भूखंडाची परस्पर विक्री करून एक जणाला तब्बल २१ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.शेख नदीम शेख हसन (रा.मकईगेट), रहेमत खान इमाम खान (रा. किराडपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. सय्यद जावेद यांच्या मालकीचे सुंदरवाडी शिवारात दोन भूखंड होते. आरोपींनी त्यांचे बनावट ओळखपत्र तयार करून हे सर्व भूखंड परस्पर दुसऱ्या व्यक्तींना विक्री केले. याबाबतचे नोंदणीकृत खरेदीखत त्यांनी करून दिले. सुमारे २१ लाखांत हे भूखंड विक्री करून त्यांची फसवणूक केली. ही बाब समजताच जावेद यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एकच भूखंडाची दोन जणांना विक्री
एकाच भूखंडाची दोन जणांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरोधात सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र दरक (रा. रोकडिया हनुमान कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार तुषार पावलस लिहणार (रा. लोकशाही कॉलनी) यांना आरोपीने भूखंड क्रमांक ७४ विक्री केला होता. याबाबतचे नोंदणीकृत खरेदीखत त्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात करून दिले होते. ७ आॅगस्ट २००० रोजी हा व्यवहार झाला होता. दरम्यान तुषार हे त्याच्या भूखंडावर गेले असता तेथे दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा फलक त्यांना दिसला. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून त्यांच्याकडील भूखंडाच्या मालकीच्या कागदपत्राची तपासणी केली. त्यावेळी आरोपी दरक यानेच त्यांना त्यांच्यापूर्वी तो भूखंड विक्री केल्याचे समजले. तुषार यांनी दरकविरोधात सिटीचौक ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Sale of plot on the basis of counterfeit documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.