खुलेआम गुटखा विक्री !
By Admin | Updated: September 7, 2014 00:24 IST2014-09-07T00:12:48+5:302014-09-07T00:24:39+5:30
आशपाक पठाण , लातूर गुटखा, सुगंधी जर्दा, मावा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांवर राज्य शासनाने घातलेली बंदी नुसतीच कागदोपत्री झाली आहे़ लातूर शहर व जिल्ह्यात

खुलेआम गुटखा विक्री !
आशपाक पठाण , लातूर
गुटखा, सुगंधी जर्दा, मावा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांवर राज्य शासनाने घातलेली बंदी नुसतीच कागदोपत्री झाली आहे़ लातूर शहर व जिल्ह्यात नामांकित कंपन्यांच्या गुटख्याची उलाढाल वाढली आहे़ बंदीच्या नावावर ग्राहकांची लूट केली जात आहे़ लातूर शहरात ओळखीच्या ग्राहकांची ‘गुटखा’सेवा केली जात असून ग्रामीण भागात पानटपरी व किराणा दुकानांमध्ये खुलेआम गुटखा विक्री केला जात आहे़ अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र याकडे कानाडोळा केला आहे़ त्यामुळे विक्रेत्यांचे फावते आहे़
राज्य शासनाने गुटखा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर विक्रेत्यांनी कारवाईच्या भितीने काही महिने विक्री थांबविली़ बंदीची चर्चा सर्वसामान्यांमध्ये वाढताच छुप्या मार्गाने नामांकित कंपन्यांचा गुटख्याने लातुरात प्रवेश केला़
आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून गुटख्याची आवक जोरात आहे़ बंदीचा गुटखा फायद्याचा ठरत असल्याने अनेक व्यावसायिकांनी गुटख्यात भांडवल वाढविले आहे़ बंदीपुर्वी मिळणारा ५० ते ६० रूपयांचा पुडा आता २०० ते ३०० रूपयांना विकला जात आहे़ लातूर शहरातही गुटख्याचे गोडावून असल्याची चर्चा विक्रेत्यांतून होत आहे़ पानटपऱ्या व किराणा दुकानांत मिळणारा गुटखा पुरवितो कोण? ही बाब अन्न व औषध प्रशासनाला नसेल काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे़ विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत, तहसील, पोलिस ठाणे, बसस्थानक व अन्य शासकीय कार्यालयाच्या परिसरात असलेल्या टपऱ्यांमध्ये खर्रा सुपारी घासली जाते़ ओळखीच्या ग्राहकांना गुटखाही पुरविला जातो़ पाच रूपयांची खर्रा सुपारी १५ ते २० रूपयांना दिली जात आहे़
सीमाभागातून प्रवेश़़़
लातूर जिल्ह्यात कर्नाटक व आंध्रप्रदेशातून चोरट्या मार्गाने गुटखा आणला जात असल्याची चर्चा आहे़ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तर बिनधास्तपणे गुटखा विकला जातो़ गुटख्याचे व्यसन असलेल्या ठराविक ग्राहकांना लातूर शहरात सहजपणे गुटखा उपलब्ध होतो़ काही भागात खुलेआम विक्री नसली तरी गुटख्याच्या रिकाम्या पुड्या पडलेल्या दिसून येतात़ अगदी पोलिस ठाण्यासमोरही विक्री केली जाते़ उदगीर, देवणी, जळकोट आदी भागात सध्या गुटखा तेजीत आहे़
गुटखा बंदीच्या निर्णयापूर्वी गुटख्याचे जे ब्रॅण्ड राज्यात नावारूपाला होते़ त्या सर्व कंपन्यांचा गुटखा बंदी असतानाही खुलेआमपणे विक्री केला जात आहे़ बंदी नसताना १ ते २ रूपयांत मिळणारी गुटख्याची पुडी आता ६ ते ८ रूपयांना मिळत आहे़ खर्रा सुपारीचे दरही तिप्पट-चौपट झाले आहेत़ पान मटेरिअलच्या दुकानात गुटखा मिळत नसल्याचे फलक लावण्यात आले असले तरी चोरीच्या मार्गाने विश्वासू विक्रेत्यांना गुटखा पुरविला जात आहे़ गुटखा बंदीचा आदेश केवळ कागदावर असून अंमलबजावणीकडे मात्र दुर्लक्ष आहे़
गुटखा विक्रीत नफा अधिक असल्याने विक्रीचा मोह कोणालाच आवरत नाही़ बंदी नावावर मिळत नसल्याचे कारण पुढे करून मुख्य विक्रेत्यांकडून तिप्पट किंमतीने गुटख्याचा पुडा विकला जातो़ दुकानात पोहोच करावा लागत असल्याने रिस्क असते़ त्यामुळे दर वाढल्याचे किरकोळ विक्रेते सांगतात़ लातूर तालुक्यातील मुरूड, चिंचोली (ब), शिराळा, तांदुळजा, औसा, रेणापूर, चाकूर, पानगाव, किल्लारी, निलंगा, अहमदपूर आदी शहरासह ग्रामीण भागातील किराणा दुकानांमध्येही गुटख्याची विक्री जोमात आहे़