शिरखुर्म्यासाठी ५ लाख लिटर दुधाची झाली विक्री
By Admin | Updated: July 6, 2016 23:52 IST2016-07-06T23:39:34+5:302016-07-06T23:52:54+5:30
लातूर : रमजान ईद गुरुवारी साजरी होत असून, बार्शी रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता सार्वजनिक नमाज अदा केली जाणार आहे

शिरखुर्म्यासाठी ५ लाख लिटर दुधाची झाली विक्री
लातूर : रमजान ईद गुरुवारी साजरी होत असून, बार्शी रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता सार्वजनिक नमाज अदा केली जाणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजता मौलाना मुस्तफासाब मजाहिरी यांचे बयान होणार आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने बार्शी रोडवरील वाहतूक मार्गात बदल केला आहे. ‘रमजान ईद’ या सणात शिरखुर्म्याला विशेष महत्त्व असून, त्यासाठी लागणाऱ्या दुधाची ५ लाख लिटर विक्री झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बार्शी रोडवरील ईदगाह मैदानावर शामियाना उभारण्यात आला असून, प्रार्थनेला ही जागा अपुरी पडत असल्याने शिवाजी चौकापर्यंत व उषाकिरण पेट्रोल पंपापर्यंत सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्ग बंद करण्यात आला आहे. गतवर्षी या प्रार्थनास्थळी मुस्लिम बांधवांची प्रार्थनेला मोठी गर्दी झाली होती. यंदा त्यात वाढ होणार असल्याने पोलिस प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. शिवाय, ‘ईद’च्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, बुधवारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी ईदगाह मैदान व परिसराची पाहणीही केली.
गुरुवारी होणाऱ्या रमजान ईदनिमित्त बुधवारी दिवसभर गंजगोलाई परिसरात साहित्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, ईदनिमित्त दुधाची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते. यासाठी वेगवेगळ्या दूध संकलन केंद्राने शहरात लागणाऱ्या दुधाचा आढावा घेऊन तो उपलब्ध करून दिला आहे. ईदनिमित्त बाजारातील खरेदीचा आकडा कोट्यवधींच्या घरात गेला आहे. ईदनिमित्त कपडे खरेदीचा बाजारही चांगलाच बहरला होता. या बाजारातही रेडिमेड कपड्यांना ग्राहकांतून मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सुका मेव्याच्या बाजारातील उलाढालही कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे ईदसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीला गेल्या आठ दिवसांपासून ग्राहकांनी गंजगोलाई परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गुरुवारी होणाऱ्या ईदची जय्यत तयारी होती.
\‘रमजान ईद’निमित्त शिरखुर्म्यासाठी दुधाची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या दुधाचे प्रमाण अधिक असते. दुधाच्या बाजारात बुधवार आणि गुरुवारी पहाटेपर्यंत विक्रमी उलाढाल झाली आहे. तब्बल ५ लाख लिटर दुधाची विक्री झाल्याची माहिती दूध विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.