विद्यापीठातील १९८६ पूर्वीच्या पीएच.डी.धारकांना वेतनवाढीचे धनादेश
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:20:23+5:30
औरंगाबाद : विद्यापीठ प्रशासनाने २५ वर्षांपूर्वी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे १९८६ पूर्वी पीएच.डी. प्राप्त शिक्षक आगाऊ वेतनवाढीपासून वंचित राहिले होते.

विद्यापीठातील १९८६ पूर्वीच्या पीएच.डी.धारकांना वेतनवाढीचे धनादेश
औरंगाबाद : विद्यापीठ प्रशासनाने २५ वर्षांपूर्वी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे १९८६ पूर्वी पीएच.डी. प्राप्त शिक्षक आगाऊ वेतनवाढीपासून वंचित राहिले होते. यातील शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत. असोसिएशन आॅफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर अॅन्युएटेड टीचर्सने केलेल्या संघर्षाला यश आले असून या शिक्षकांना वितरित करण्यासाठी शासनाने ५० लाख रुपये निधी विद्यापीठाकडे सुपूर्द केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एम.ए. वाहूळ यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या २७ फेब्रुवारी १९८९ च्या आदेशानुसार जे शिक्षक १ जानेवारी १९८६ पूर्वी पीएच.डी. आणि प्रपाठकाच्या वेतनश्रेणीत होते त्यांना ३ आगाऊ वेतनवाढी देय होत्या. या आदेशाचा लाभ राज्यातील राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयातील शिक्षकांना मिळाला आहे; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पात्र शिक्षक या लाभापासून वंचित राहिले होते. असोसिएशनने २०१० ला या प्रश्नाला सर्वप्रथम वाचा फोडली; परंतु विद्यापीठ प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. डॉ. वाहूळ, उपाध्यक्ष डॉ. जे.एम. मंत्री, सचिव प्राचार्य मो. शफी, प्रा. सुभाष नाफडे, डॉ. एम.डी. जाहागीरदार आदींनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. सध्या शासनाने ४९ शिक्षकांसाठी ५० लाख रुपयांचा निधी विद्यापीठाकडे सुपूर्द केला आहे. वंचित शिक्षकांना धनादेशाचे वाटप सन्मानपूर्वक करावे, अशी मागणी कुलसचिवांनी मान्य केली असून, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती असोसिएशनने दिलेल्या पत्रकात दिली आहे.