शिक्षिकेला पावणेतीन लाखांना गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:47 IST2017-07-26T00:47:10+5:302017-07-26T00:47:10+5:30
जालना : भामट्याने येथील एका शिक्षिकेची दोन लाख ८० हजारांची फसवणूक केली.

शिक्षिकेला पावणेतीन लाखांना गंडविले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्टेट बँकेतून बोलत आहे. एटीएम कार्ड डिजिटल करायचे आहे. तुमचा एटीएमचा कोड सांगा. मोबाइलवर आलेला चार अंकी क्रमांक द्या, असे सांगून एका भामट्याने येथील एका शिक्षिकेची दोन लाख ८० हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव हेमाली हिरेन सियाल असे आहे. १८ जुलै रोजी हेमाली यांना त्यांच्या मोबाईलवर राहुल वर्मा असे नाव सांगणाºया व्यक्तीने ९५२३७८८१५९ या क्रमांकावरून कॉल केला. स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सागून, एटीएम डिजिटल करण्यासाठी त्याने हेमाली यांना एटीएमचा पिन क्रमांक मागितला. बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी पिन क्रमांक दिला. त्यानंतर राहुल वर्मा नावाच्या व्यक्तीने १८ ते २३ जुलै दरम्यान वारंवार कॉल करून हेमाली यांच्याकडून ओटीपी क्रमांक घेतला. दरम्यान, बाहेरगावी गेलेले हेमाली यांचे पती २३ जुलैला घरी आल्यानंतर त्यांनी एक व्यक्ती सतत फोन करून ओटीपी क्रमांक मागत असल्याचे सांगितले.
शंका आल्याने सियाल दाम्पत्याने एसबीआयच्या देऊळगावराजा रोडवरील शाखेत जाऊन चौकशी केली. एटीएमवर जाऊन खात्यातील शिल्लक तपासली. तेव्हा खात्यातून दोन लाख ८० हजार रुपये काढून घेण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर हेमाली यांनी पतीसह सदर बाजार ठाण्यात येऊन फिर्याद दिली.