साध्वी प.पू. प्रभाकंवरजी म.सा. अनंतात विलीन
By Admin | Updated: September 3, 2014 00:21 IST2014-09-03T00:14:19+5:302014-09-03T00:21:01+5:30
औरंगाबाद : श्वेतांबर जैन समाजाच्या ज्येष्ठ साध्वी प्रभाकंवरजी म.सा. यांना मंगळवारी दुपारी ३ वाजता सामूहिक मंत्रघोषात मुखाग्नी देण्यात आला़

साध्वी प.पू. प्रभाकंवरजी म.सा. अनंतात विलीन
औरंगाबाद : श्वेतांबर जैन समाजाच्या ज्येष्ठ साध्वी प्रभाकंवरजी म.सा. यांना मंगळवारी दुपारी ३ वाजता सामूहिक मंत्रघोषात मुखाग्नी देण्यात आला़ चिकलठाणा येथील महावीर जैन गोशाळा येथील अंत्यविधीला देशभरातून शोकाकुल भाविक हजारोंच्या संख्येने दाखल झाले होते़ जैन श्रावक संघासह सकल जैन समाजबांधवांनी साध्वी प़पू़ प्रभाकंवरजी म़सा़ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली़
महावीर भवनात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती़ सकाळी ११ वाजता प्रभाकंवरजी म़सा़ यांची पालखी स्वर्गरोही रथामध्ये ठेवण्यात आल्यानंतर महानिर्वाण यात्रेला सुरुवात झाली़ कुंभारवाडा येथून निघालेली यात्रा पैठण गेटहून खोकडपुरामार्गे जालना रोडवर दाखल झाली़ या पायी यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते़
महिला श्राविकांनी यावेळी नमोकार जपाचा जयघोष केला़ महाराष्ट्र प्रवर्तिणी, ज्ञानगंगोत्री महासतीयाजी प़पू़ प्रभाकंवरजी म़ सा़ यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भावुक झाला होता़ प्रभाकंवरजी म़सा़ अमर रहे, अशा आशयाचे अनेक फलक महानिर्वाण यात्रामार्गात श्रावकांनी लावले होते़
जैन भावगीत मंडळाच्या कलाकारांनी विविध भक्तिगिते सादर केली़ त्यासोबतच विविध ब्रॉसबँडच्या शोकसंगीताने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते़ यात्रेदरम्यान पैठण गेटवरील बहुतेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती़
अंत्यविधीला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आ़ सुभाष झांबड, आ़ ओमप्रकाश पोकर्णा, आ़ प्रदीप जैस्वाल, आ़ प्रशांत बंब, खा़ चंद्रकांत खैरे, प्रकाश मुगदिया, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, महावीर पाटणी, श्रावक संघाचे अध्यक्ष झुंबरलाल पगारिया, ताराचंद बाफना, खंडेलवाल जैन समाजाचे ललित पाटणी, सकल मारवाडी समाजाचे अध्यक्ष डॉ़ पुरुषोत्तम दरख आदींसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ प्रभाकंवरजी म़सा़ यांच्या जीवन कार्याचे विवेचन इंदरचंद संचेती यांनी केले़
महानिर्वाण यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़
अंत्यविधीपूर्वी वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघ, श्री़ गुरुगणेश शिक्षण समिती, सकल जैन समाज, विविध जिल्ह्यांतून आलेले श्रावक संघाचे अध्यक्ष यांनी शालींचे अर्पण केले़
अंत्यविधीला देशभरातील श्रावक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी हजर होते़ लातूर श्रावक संघाचे अध्यक्ष विष्णुदास पोकर्णा, प्रेमचंद लोढा (सेलू ), सुदेश संकलेचा (जालना), कुचेरिया (सेवली), अशोक लोढा (चौसाळा), अनिल गोलेच्छा (सिल्लोड), पद्म सामरा (अमरावती), भवरीलालजी कोठारी (आर्णी- यवतमाळ), राजेंद्र पोकर्णा (परभणी), गोटूशेठ चोपडा (नाशिक), पद्मचंद रांका (सोलापूर), माणकचंद कटारिया (बदनापूर), श्री भंडारी (बीड), प्रकाश कोठारी (यवतमाळ), शांतीलाल गुणवंत भगूर श्रावक संघ आदींंसह देशभरातील श्रावक संघांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़
संतांचे संदेश पत्र
प्रभाकंवरजी म़सा़ यांच्या मार्गदर्शनाने अनेक धर्मस्थानक रूपास आले आहेत़ त्यामुळे या सर्वच धर्मस्थानकांतील समुदायाची अंत्यविधीला उपस्थिती होती़ दिल्ली येथील आचार्य डॉ़ शिवमुनीजी महाराज यांनी पाठविलेल्या पत्राचे वाचन यावेळी प्रकाश झांबड यांनी केले़
प्रभाकंवरजी म़सा़ या एक तपस्वी साध्वी होत्या़ त्यांचा सहवास लाभलेल्या प्रत्येकाचे कल्याण झाले असल्याचे या पत्रात लिहिले होते़ त्यासोबतच प़पू़ कुंदनऋषीजी यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्राचे वाचन ताराचंद बाफना यांनी केले़ साध्वीरत्ना या ओजस्वी-तेजस्वी होत्या़ त्यांच्या जाण्याने संपूर्ण समाजाला मोठे दु:ख झाले आहे़, असे त्या पत्रात नमूद केले गेले होते़