सदाभाऊ खोत यांचे हेलिकॉप्टर तासभर हवेतच भरकटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:19 IST2019-04-10T00:19:20+5:302019-04-10T00:19:55+5:30
सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या जाहीर सभेसाठी येताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हेलिकॉप्टरला दिशाच न मिळाल्याने ते तासभर हवेतच भरकटले.

सदाभाऊ खोत यांचे हेलिकॉप्टर तासभर हवेतच भरकटले
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या जाहीर सभेसाठी येताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हेलिकॉप्टरला दिशाच न मिळाल्याने ते तासभर हवेतच भरकटले.
हेलिकॉप्टरने सोयगाव परिसर पिंजून काढल्याने सदाभाऊ खोत यांना तासभर हवेतच राहावे लागले. हेलिकॉप्टर लँड होण्यासाठी रात्री वेगळे आणि सकाळी वेगळे असे दोन लोकेशन मिळाल्याने हा घोळ झाल्याचे पायलट एम. बॉबी यांनी सांगितले.
मुंबईवरून खासगी हेलिकॉप्टर निंबायतीकडे येत असताना पायलटला सोमवारी रात्री सोयगाव आणि मंगळवारी सकाळी रामपुरा असे वेगवेगळे दोन लोकेशन मिळाल्याने पायलटला हेलिकॉप्टरसह सोयगाव आणि गलवाडा गावावर घिरट्या घालाव्या लागल्या. जिल्ह्याच्या नकाशातच नसलेले रामपुराचे लोकेशन न मिळाल्याने गोंधळ उडाला होता. तासभर हेलिकॉप्टर हवेतच असल्याचे पाहून अखेर भाजपचे पदाधिकारी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी धूर करून हेलिकॉप्टरला अजिंठा डोंगराच्या पायथ्याजवळ रामपुरा गावाचे लोकेशन दिले. त्यानंतर हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरले व सदाभाऊ खोत सभास्थानी पोहोचले.