बरखास्त केलेली भरारी पथके पुन्हा कार्यान्वित
By Admin | Updated: October 30, 2014 00:30 IST2014-10-30T00:18:42+5:302014-10-30T00:30:57+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासून पदवी परीक्षांना सुरुवात झाली

बरखास्त केलेली भरारी पथके पुन्हा कार्यान्वित
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासून पदवी परीक्षांना सुरुवात झाली. परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी रात्री कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी तडकाफडकी १७ भरारी पथके बरखास्त करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. आज बामुक्टा या संघटनेच्या शिष्टमंळाने कुलगुरूंची भेट घेऊन विविध तांत्रिक बाबी निदर्शनास आणून दिल्यावर भरारी पथके पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.
विद्यापीठ प्रशासनाने यंदा कॉपीमुक्त धोरण कडकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्याचा संपूर्ण वर्षाचा परफॉर्मन्स रद्द करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतलाय. परीक्षा मंडळातील ज्येष्ठ सदस्य डॉ. कल्याण लघाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या निर्देशाप्रमाणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात म्हणजेच चार जिल्ह्यांमध्ये १७ भरारी पथके नेमली होती. भरारी पथके स्थापन करताना त्यामध्ये प्राध्यापकांची सेवाज्येष्ठता, आरक्षण व महिला या तिन्ही निकषांची पूर्तता करण्यात आलेली नाही, म्हणून कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी मंगळवारी रात्री उशिरा सर्व १७ भरारी पथके बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.
आज बामुक्टा संघटनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन सेवाज्येष्ठता, आरक्षण, महिलांचा समावेश असल्याबद्दलची सर्व माहिती दिली. तब्बल ४५ मिनिटे चर्चा करण्यात आली. त्यानंतर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सर्व भरारी पथके पुन्हा कार्यान्वित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. शिष्टमंडळात अधिष्ठाता विलास खंदारे, डॉ. एस.एस. शेख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य शिवाजी कदम, सिनेट सदस्य डॉ. गणी पटेल, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. जिगे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. संजय सांभाळकर, डॉ. संजय पाटील, बाबा सलामपुरे आदींची उपस्थिती होती.