परिस्थितीशी झुंज देत सचिनचा षटकार..!
By Admin | Updated: June 19, 2014 00:18 IST2014-06-18T23:58:58+5:302014-06-19T00:18:05+5:30
भालचंद्र येडवे , लातूर घरात शिक्षणाचा वारसा नाही... आर्थिक परिस्थिती हलाखीची... सात-आठ वर्षांपासून जन्मदात्या वडिलांचा संपर्क नाही...

परिस्थितीशी झुंज देत सचिनचा षटकार..!
भालचंद्र येडवे , लातूर
घरात शिक्षणाचा वारसा नाही... आर्थिक परिस्थिती हलाखीची... सात-आठ वर्षांपासून जन्मदात्या वडिलांचा संपर्क नाही... असे एक ना अनेक प्रश्न सतावत असतानाही फक्त आपल्या आईचा चेहरा समोर ठेवून परिस्थितीशी झुंज देत सचिनने यशोशिखर गाठत थेट षटकारच मारले.
उमरगा तालुक्यातील बलसूरचा मूळ रहिवासी असलेला सचिन भीमराव नांगरे याने पहिली ते चौथीपर्यंत लातूरच्या शिवाजी विद्यालयात, तर ५ वी ते ७ वीपर्यंत मोगरगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. सचिनच्या वडिलांची परिस्थितीही हलाखीची. नव्हे, गेल्या सात-आठ वर्षांपासून सचिनच्या वडिलांनी त्याचे तोंडही बघितले नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आणि सचिनच्या शिक्षणाची आवड पाहून मामा महादेव बबन सोनवणे यांनी त्याच्या शिक्षणाचा विडा हाती घेतला अन् सचिनसाठी लातूरला घर करून त्याला सदानंद विद्यालयात प्रवेश दिला. त्याची आई मोलमजुरी व घरकाम करून सचिनची देखभाल करीत आहे. लहानपणापासून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या सचिनला भौतिक सुविधा काय असतात, याची कसलीही जाणीव नव्हती. त्याने आपल्या परिस्थितीची जाण ठेवत संघर्षातूनच यशाचा मार्ग शोधला नि दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केले.
सचिनची परिस्थिती व जिद्द पाहून शाळेतील शिक्षक व मामांनी त्याचे बोट धरून यशोशिखरापर्यंत नेऊन पोहोचविले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना त्यावर मात करून लेकराने कष्टाचे चीज केले, अशी भावना सचिनच्या आईने व्यक्त केली. त्याच्या यशाचा सर्वत्र गवगवा होत आहे. मात्र एवढ्या मोठ्या यशाची सचिनच्या वडिलांना मात्र तसूभरही कल्पना नाही, ही खंत मात्र सचिनच्या मनात राहिली. सचिनला इंजिनिअर व्हायचे असून, त्याचा भाऊही मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. तर लहान बहीणही मामाकडेच शिक्षण घेत आहे. मी कितीही साथ दिली असली, तरी सचिनने आपल्या जिद्दीवरच एवढे मोठे यश संपादन केल्याने मी व माझ्या बहिणीने केलेल्या कष्टाचे चीज झाले, अशी भावना सचिनचे मामा महादेव सोनवणे यांनी व्यक्त केली.