सचिन मुळे यांचा भाजपाला नकार
By Admin | Updated: May 23, 2014 01:09 IST2014-05-23T01:00:29+5:302014-05-23T01:09:38+5:30
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन मुळे यांनी पदवीधर मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी घेण्यास गुरुवारी नकार दिला.

सचिन मुळे यांचा भाजपाला नकार
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन मुळे यांनी पदवीधर मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी घेण्यास गुरुवारी नकार दिला. मुळे यांच्या बन्सीलालनगरातील निवासस्थानी यासंदर्भात बोलणी करण्यास गेलेल्या खा. रावसाहेब दानवे यांची शिष्टाई फळास येऊ शकली नाही. मुळे यांच्या नकारानंतर पक्षातील इच्छुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील राजकारणाचा फायदा घेण्यासाठी भाजपाने गेल्या सहा महिन्यांपासून टाकलेल्या गळास सचिन मुळे लागले नाहीत. मुळे यांची उमेदवारी भाजपाच्या राज्यातील नेतृत्वाने जवळजवळ निश्चित केली होती. त्यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी पक्षाने खा. रावसाहेब दानवे यांच्यावर सोपविली होती. त्यानुसार खा. दानवे गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुळे यांच्या निवासस्थानी पोहोचले. मधुकरअण्णा मुळे, सचिन मुळे यांनी त्यांचे स्वागत केले; परंतु उमेदवारी स्वीकारण्याची भाजपाची विनंती त्यांनी मान्य केली नाही. चौघे अंतिम फेरीत या घटनेनंतर भाजपाच्या राज्यातील पक्ष नेतृत्वाने पक्ष कार्यकर्त्यांच्या नावावर विचार सुरू केला. इच्छुकांना भेटून त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी खा. दानवे यांच्यावरच टाकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जातीय समीकरणाचा विचार करता खा. गोपीनाथ मुंडे यांना या मतदारसंघातून ब्राह्मण किंवा मराठा उमेदवार हवा आहे. त्याचमुळे सचिन मुळे यांचा आग्रह धरला जात होता; परंतु ते नाव कमी झाल्याने आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांचे नाव इच्छुकांच्या यादीत समाविष्ट करून घेण्यात आले आहे. विजया रहाटकर, शिरीष बोराळकर व प्रवीण घुगे यांच्यासह एकनाथ जाधव यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. या चौघांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली व आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या असे सांगितले. उमेदवार निवडण्यास खा. गोपीनाथ मुंडे, खा. रावसाहेब दानवे व प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांना सांगण्यात आले आहे. आम्ही गेल्या ३५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहोत व पुढेही राहू. माझ्या नावाची नाहक चर्चा झाली. मला भाजपाने ५ महिन्यांपूर्वीच उमेदवारी देऊ केली होती; परंतु तेव्हाही आम्ही होकार दिला नाही. पडत्या काळात तर पक्षासोबत राहण्यातच पुरुषार्थ आहे. मी कधीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नाही. रावसाहेबांचे व आमचे कौटुंबिक संबंध आहेत. माध्यमांतील चर्चेच्या पार्श्वभूमीवर ते आमचे मत जाणून घेण्यासाठी आले होते. -सचिन मुळे पक्ष कार्यकर्त्यालाच संधी बाहेरून उमेदवार आयात करणार नाही. पक्ष कार्यकर्त्यालाच आम्ही उमेदवारी देणार आहोत. पक्षातील इच्छुकांशी चर्चा करण्याची जबाबदारी खा. रावसाहेब दानवे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते इच्छुकांशी चर्चा करून उद्या अहवाल देतील. मुंडे साहेब व आम्ही मिळून उद्या किंवा परवा उमेदवारी घोषित करू. -देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष भाजपा