साश्रू नयनांनी जवान दुबे यांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:53 IST2017-07-27T23:53:16+5:302017-07-27T23:53:16+5:30
सोनपेठ : तालुक्यातील डिघोळ येथील जवान छोटूलाल दुबे यांच्या पार्थिवावर २७ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

साश्रू नयनांनी जवान दुबे यांना निरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : तालुक्यातील डिघोळ येथील जवान छोटूलाल दुबे यांच्या पार्थिवावर २७ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथील छोटूलाल दुबे (वय ४६) हे जम्मू काश्मिरमधील श्रीनगर येथे १०१ मराठा लाईट इन्फंट्रीच्या तुकडीमध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी दुबे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने दिल्लीतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २६ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी छोटूलाल दुबे यांचे पार्थिव सोनपेठ तालुक्यातील डिघोळ या मूळ गावी आणण्यात आले.
यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दुबे यांची पत्नी, आई, वडील, भाऊ, मुलगा व नातेवाईकांनी अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या एका ट्रॅक्टरमध्ये जवान दुबे यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘जवान छोटूलाल दुबे अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी दोन्ही बाजुंनी ग्रामस्थांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. जवान दुबे यांचा मोठा मुलगा ऋषिकेश याने अग्नी दिला. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, उपजिल्हाधिकारी चुन्नीलाल कोकणी, तहसीलदार जीवराज डापकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, शिवाजी मव्हाळे, रंगनाथ सोळंके, केशव भोसले, गोपाळ भोसले, रमेश इंदूरकर, उत्तमराव शिंदे आदींची उपस्थिती होती.