‘एस. टी.’ ची शनिवारपासून ‘वर्षा सहल’
By Admin | Updated: July 24, 2014 00:39 IST2014-07-24T00:26:42+5:302014-07-24T00:39:34+5:30
औरंगाबाद : रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे शहराजवळील पर्यटनस्थळे हिरवळीने बहरली आहेत.

‘एस. टी.’ ची शनिवारपासून ‘वर्षा सहल’
औरंगाबाद : रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे शहराजवळील पर्यटनस्थळे हिरवळीने बहरली आहेत. तसेच सोमवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी दिवसांत पर्यटन आणि देवदर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळानेही यासाठी कंबर कसली असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी २६ जुलैपासून शहराजवळील स्थळांसाठी वर्षा सहल बससेवा सुरू केली जात आहे.
वर्षा सहल बससेवेअंतर्गत वेरूळ, खुलताबाद आणि म्हैसमाळ येथे जाण्याची सुविधा देण्यात येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी १० वाजता ही बस वेरूळसाठी रवाना होईल. त्यानंतर खुलताबाद आणि म्हैसमाळसाठी बस रवाना होईल. प्रवाशांना वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचे तसेच खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे, तर म्हैसमाळ येथील बालाजी मंदिराचे दर्शन घेता येईल. तसेच जगप्रसिद्ध वेरूळची लेणी आणि म्हैसमाळ येथील व्ह्यू पॉइंटहून निसर्ग सौंदर्य न्याहाळता येईल. पावसाळी हंगाम हा महामंडळासाठी कमी गर्दीचा हंगाम असतो. या कालावधीत प्रवाशांची संख्या कमी होते. परंतु त्याच वेळी शहराजवळील या स्थळांना भेट देणाऱ्यांची मोठी गर्दी असते. शहरात रोज मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक येतात. या पर्यटनस्थळी जाण्यापूर्वी अनेक पर्यटक किफायतशीर अशा वाहनांचा प्राधान्याने विचार करतात. त्यामुळे एस. टी. महामंडळाकडून सुरूकरण्यात येणारी ही बससेवा महत्त्वाची ठरणार आहे. ‘वर्षा सहल’ साठी ४४ आसनी लाल बस सोडण्यात येणार असून, त्यासाठी आरक्षणाची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक (वरिष्ठ ) प्रताप जाधव यांनी दिली.
प्रवासी वाढविण्यास मदत
कमी गर्दीचा हंगाम असल्याने या कालावधीत प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी महामंडळातर्फे विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे वर्षा सहल बससेवा प्रवासी वाढविण्याबरोबर उत्पन्नात वाढ होण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
अजिंठा पॅकेज टूर्स
एस. टी. महामंडळातर्फे फेबु्रवारीमध्ये औरंगाबाद- अजिंठा अशी विशेष सहल बस (अजिंठा पॅकेज टूर्स) सुरू करण्यात आली होती. प्रवाशांकडून त्यास प्रारंभी प्रतिसाद मिळाला होता. या टूर्स पॅकेजला जवळपास ५५ टक्के प्रतिसाद मिळाला होता.
प्रवाशांची सुविधा
शनिवारपासून वेरूळ, खुलताबाद आणि म्हैसमाळसाठी वर्षा सहल बससेवा सुरू करण्यात येत आहे. यामुळे शहराजवळील या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांची सुविधा होईल, असे विभाग नियंत्रक संजय सुपेकर म्हणाले.