ग्रामीण रूग्णालयच खाटेवर

By Admin | Updated: July 13, 2014 00:18 IST2014-07-13T00:10:07+5:302014-07-13T00:18:20+5:30

संदीप अंकलकोटे , चाकूर येथील ग्रामीण रूग्णालयात पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने त्याचा रूग्णसेवेवर परिणाम होत आहे़ त्यातच काही कर्मचारी अनधिकृतरित्या गैैरहजर राहत असल्याचे दिसून येत आहे़

The rural hospital only on the cot | ग्रामीण रूग्णालयच खाटेवर

ग्रामीण रूग्णालयच खाटेवर

संदीप अंकलकोटे , चाकूर
येथील ग्रामीण रूग्णालयात पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने त्याचा रूग्णसेवेवर परिणाम होत आहे़ त्यातच काही कर्मचारी अनधिकृतरित्या गैैरहजर राहत असल्याचे दिसून येत आहे़
चाकूर येथील ग्रामीण रूग्णालय हे ३० खाटांचे आहे़ रूग्णालयात १ वैद्यकीय अधीक्षक, ३ वैद्यकीय अधिकारी, ७ अधिपरिचारिका, ४ कक्ष सेवक, २ स्वच्छता सेवक, २ कनिष्ठ लिपिक व प्रत्येकी १ कार्यालयीन सेवक, कार्यालयीन सहाय्यक अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक तंत्रज्ञ, एक्स रे टेक्निशियन, औषध निर्माण अधिकारी, नेत्र चिकित्सा अधिकारी, वाहनचालक आहेत़ यातील १ वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असून, उर्वरित २ पदांवर महिला डॉक्टर असून, त्याही कंत्राटी आहेत़ इंडियन पब्लिक हेल्थच्या नियमानुसार प्रत्येकी १ जनरल सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, नेत्रचिकित्सा तज्ज्ञ व अन्य सहा वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे़ केवळ १ वैद्यकीय अधिकारी व २ नवख्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हे रूग्णालय सुरु आहे़
चाकूर हे शहर लातूर-नांदेड राज्य मार्गावर असल्याने अपघाताचे प्रमाण अधिक आहे़ याशिवाय दररोज १५० ते २०० रूग्णांची तपासणीसाठी नोंदणी असते़ वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे़ त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा बट्टयाबोळही होत असल्याचे दिसून येत आहे़ रूग्णालयात केवळ एकच स्वच्छता सेवक असल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे़ १ स्वच्छता सेवक गेल्या दीड वर्षापासून अनधिकृतपणे गैरहजर आहे़
कामकाजावरही परिणाम़़़
कार्यालयीन सहाय्यक अधीक्षक हे गेल्या दोन वर्षापासून बीड जिल्हा रूग्णालयात प्रतिनियुक्तीवर आहेत़ त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर पडत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले़
चाकूरच्या ग्रामीण रूग्णालयास वैद्यकीय अधीक्षक मिळावा म्हणून पत्रव्यवहार करण्यात आला़ मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही़ असे सांगून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ बी़एस़ कोरे म्हणाले, रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत़ शासनाकडून पदे भरण्यात आल्यानंतर चाकूरच्या रूग्णालयास आवश्यक वैद्यकीय अधिकारी देण्यात येतील़

Web Title: The rural hospital only on the cot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.